पुणे : भारत माता की जय अशा देशभक्तीपर जयघोषात पुण्यात तिरंगा पूजनाचा प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘ घरघर तिरंगा’ अभियानांतर्गत जम्मू–काश्मीरमधील भारत–पाक सीमेवरील पुच्छ जिल्ह्यात ९ मराठा रेजिमेंटच्या वतीने १,००० तिरंग्यांचे वितरण करण्यात येणार आहे. हे तिरंगे सीमावर्ती भागातील घरांपर्यंत पोहोचवले जाणार आहेत.

या उपक्रमासाठी आम्ही पुणेकर संस्थेच्या पुढाकाराने पुण्यात तिरंगे पाठवण्याचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जांभूळवाडी येथील विवा सरोवर परिवाराच्या वतीने दत्त मंदिरात या तिरंग्यांचे विधीवत पूजन करण्यात आले.

या देशसेवेच्या प्रेरणादायी अभियानात महिलांचा सक्रिय सहभाग हे या उपक्रमाचे वैशिष्ट्य ठरले. देशप्रेम आणि सामाजिक बांधिलकी जपत महिलांनी मोठ्या उत्साहाने या अभियानात सहभाग नोंदवला.
या उपक्रमामुळे देशाबद्दलचा अभिमान अधिक दृढ झाला असून, सीमेवर तैनात असलेल्या जवानांना यामुळे निश्चितच प्रेरणा मिळेल, अशी भावना उपस्थित महिलांनी व्यक्त केली.
या वेळी विवा सरोवर सोसायटी महिला भजनी मंडळाच्या प्रेरणा मिसाळ, सोनिया इथापे, अंजली काळबांडे, मिठी मोहंती, राधिका कुरळे, वनिता डोंगरे आदी उपस्थित होत्या.