पुणे : खासदार व कुस्ती क्षेत्राचे आश्रयदाते Sharad Pawar यांनी डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर याला १२ लाख रुपयांची शिष्यवृत्ती जाहीर केली असून, काका पवार यांच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलासाठी ५० लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले आहे.

मुंबई येथे हर्षवर्धन सदगीर यांच्यासह अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी उद्योजक मोहसीन बागवान, कुस्ती प्रशिक्षक शिवाजी कोळी, महाराष्ट्र चॅम्पियन पृथ्वीराज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

हर्षवर्धन सदगीर याच्या यशाचे कौतुक करताना, ऑलिम्पिक स्पर्धांसाठी तयारीसाठी पुढील दोन वर्षांसाठी दरमहा ५० हजार रुपयांप्रमाणे १२ लाख रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली. तसेच, काका पवार यांच्या तालमीतील हर्षवर्धनसह ११ मल्लांनी मिळवलेल्या यशाबद्दल आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाला ५० लाख रुपयांचे सहाय्य देण्यात आले.
शरद पवार यांचे आभार व्यक्त करताना काका पवार म्हणाले, “पवार हे खेळाडूंसाठी आधारवड आहेत. त्यांनी केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष धनादेश देऊन विजेत्यांचा सन्मान केला. क्रिकेटनंतर कुस्ती क्षेत्रातही त्यांनी मोठे योगदान दिले आहे.
हर्षवर्धन सदगीर म्हणाला, “गुरू काका पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मी पुन्हा महाराष्ट्र केसरी स्पर्धेत उतरणार आहे. मात्र, माझे अंतिम ध्येय ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे आहे. शरद पवार यांची मदत माझ्यासाठी प्रेरणादायी आहे.”
शासनाकडून नोकरीचे आश्वासन
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही काका पवार व हर्षवर्धन सदगीर यांनी भेट घेतली. यावेळी येत्या अधिवेशनात नाशिक महानगरपालिकेत नोकरी देण्याचे आश्वासन शिंदे यांनी दिल्याचे काका पवार यांनी सांगितले.