पुणे : “शिक्षणाचा उद्देश आरशांचे खिडक्यांमध्ये आणि खिडक्यांचे दरवाजांमध्ये रूपांतर करणे आहे,” या सिडनी जे. हॅरिस यांच्या विचारांना प्रत्यक्षात जगणाऱ्या लीला पूनावाला फाउंडेशनने (एलपीएफ) २०२५ मध्ये देशभरातील १,४५० हून अधिक गुणवंत व आर्थिकदृष्ट्या गरजू मुलींना गुणयोग्यता व गरज-आधारित शिष्यवृत्ती प्रदान केल्या आहेत. यानिमित्ताने शिक्षणाद्वारे जीवन परिवर्तनाच्या ३० वर्षांचा गौरवशाली टप्पा फाउंडेशनने साजरा केला.
शिष्यवृत्तीधारकांपैकी १,१०० हून अधिक मुली अभियांत्रिकी, नर्सिंग, मूलभूत विज्ञान आणि आरोग्य विज्ञान या क्षेत्रांत पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. याशिवाय, सातवीतील ३५० हून अधिक मुली एलपीएफच्या शालेय प्रकल्पात सहभागी झाल्या असून, या उपक्रमांतर्गत त्यांना सातवीपासून पदवीपर्यंत दहा वर्षे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व सहाय्य दिले जाते.
या विशेष वर्षात एलपीएफतर्फे देशभरात ११ प्रादेशिक पुरस्कार सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले. ३० व्या शिष्यवृत्ती पुरस्कार सोहळ्यास भारताच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी व पुद्दुचेरीच्या माजी नायब राज्यपाल डॉ. किरण बेदी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तीन दशकांनंतर पुन्हा एकदा एलपीएफच्या व्यासपीठावर येताना त्यांनी फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले. “तीन दशकांपूर्वी केवळ २० लाभार्थी असलेल्या एलपीएफचे आज जवळपास १९,००० सदस्यांचे कुटुंब झाले आहे,” असे त्यांनी नमूद केले.
यावेळी वरिष्ठ लीला कन्यांनी आपल्या यशस्वी प्रवासाचे अनुभव कथन करून नव्या विद्यार्थिनींना प्रेरणा दिली. पद्मश्री लीला पूनावाला यांनी सांगितले की, शिष्यवृत्तींसोबतच कौशल्य विकास, करिअर समुपदेशन, कॉर्पोरेट सज्जता व उद्योगभेटी यांसारख्या उपक्रमांद्वारे मुलींना भविष्यातील नेतृत्वासाठी सक्षम केले जाते.
सध्या एलपीएफ पुणे, वर्धा, अमरावती, नागपूर, हैदराबाद व बंगळूर येथे कार्यरत असून, २०३० पर्यंत २५,००० मुलींना सक्षम करण्याचा संकल्प फाउंडेशनने व्यक्त केला आहे.
