पुणे : सुपर मास्टर गेम्स अँड स्पोर्ट्स फेडरेशनच्या वतीने महाराष्ट्रात प्रथमच पिंपरी-चिंचवड येथे आयोजित करण्यात आलेल्या ८ व्या राष्ट्रीय मास्टर गेम्स स्पर्धेत पुणे जिल्ह्याने अभिमानास्पद यश संपादन केले आहे. ७० वर्षांवरील पुरुष वयोगटातील पोहण्याच्या स्पर्धेत महाराष्ट्रातील पुणे, मोशी येथील केंद्रीय विहार सोसायटीतील ज्येष्ठ नागरिक रमेश जाधव (वय ७३ ) यांनी राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट कामगिरी करत एकूण चार पदकांची कमाई केली.

पिंपरी येथील आण्णासाहेब मगर स्टेडियम जलतरण तलावात २८ व २९ जानेवारी रोजी झालेल्या पोहण्याच्या स्पर्धांमध्ये रमेश जाधव यांनी २०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोकमध्ये सुवर्ण पदक पटकावले . तसेच २०० मीटर फ्री स्टाईलमध्ये रौप्य, तर १०० मीटर व ५० मीटर फ्री स्टाईलमध्ये ताम्र पदके मिळवून त्यांनी आपली सातत्यपूर्ण गुणवत्ता सिद्ध केली.

सुपर मास्टर गेम्स अँड स्पोर्ट्स फेडरेशनचे कार्यकारी अधिकारी विनोद कुमार, महाराष्ट्र अध्यक्ष रामसिंग संघा आणि सरचिटणीस शैलेश फुलसुंगे यांच्या हस्ते रमेश जाधव यांना पदक प्रदान करून गौरविण्यात आले. ७० वर्षांवरील पुरुष वयोगटात चार पदके मिळविणारे रमेश जाधव हे महाराष्ट्रातील एकमेव स्पर्धक ठरले *आहेत .

या यशाच्या जोरावर पुढील वर्षी जपान येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मास्टर गेम्स स्पर्धेसाठी रमेश जाधव यांचा प्रवेश निश्चित झाला आहे.
रमेश जाधव हे केंद्र सरकारच्या भारतीय ऊस संशोधन संस्था, लखनऊ संचालित प्रवरानगर येथील जैविक नियंत्रण केंद्रामध्ये कीटकशास्त्रज्ञ (वर्ग १) पदावर कार्यरत होते आणि तेथून ते निवृत्त झाले आहेत. तरुणपणापासून पोहण्याची आवड जपत त्यांनी सातत्याने सराव सुरू ठेवला आहे.

यापूर्वी २००५ मध्ये प्रवरानगर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य मास्टर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी पोहण्यात ताम्र पदक मिळविले होते. तसेच २०२५ मध्ये पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या ६ व्या महाराष्ट्र स्टेट मास्टर गेम्स स्पर्धेत त्यांनी एक सुवर्ण व दोन रौप्य पदके पटकावली होती.
वयाला न जुमानता क्रीडा क्षेत्रात मिळवलेले हे यश अनेक ज्येष्ठांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *