पुणे : पुणे शहर वाहतूक विभागात उल्लेखनीय व प्रभावी कामगिरी केल्याबद्दल पोलिस उपनिरीक्षक (PSI) लक्ष्मण नवगणे यांचा माननीय पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. वाहतूक शिस्त, नियोजन तसेच नागरिकाभिमुख कामकाजात दिलेल्या योगदानाची वरिष्ठ स्तरावर दखल घेण्यात आली.

महाराष्ट्र पोलिस दलाचा २ जानेवारी स्थापना दिवस सप्ताह स्वरूपात साजरा करण्याचे आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. त्या अनुषंगाने परिमंडळ ६ अंतर्गत मुद्देमाल वितरण समारंभ गुरुवारी (८ जानेवारी) विमाननगर येथील सिम्बायोसिस स्कूल ऑफ इंटरनॅशनलच्या सभागृहात पार पडला.

या कार्यक्रमात गुन्ह्यांत जप्त करण्यात आलेला मुद्देमाल संबंधित फिर्यादींना पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते परत करण्यात आला. याच वेळी पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण नवगणे यांच्या कार्याची विशेष प्रशंसा करत त्यांचा औपचारिक सत्कार करण्यात आला.

सध्या पुणे शहर वाहतूक विभागात कार्यरत असलेल्या नवगणे यांनी वाहतूक नियोजन, शिस्तबद्ध अंमलबजावणी आणि नागरिकांशी समन्वय साधत केलेल्या कामामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेत सकारात्मक बदल घडवून आणल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

या कार्यक्रमास पुणे शहर पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील व पंकज देशमुख, पोलिस उप आयुक्त हेमंत जाधव, निखील पिंगळे, सोमई मुंडे यांच्यासह पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण नवगणे यांच्या या सन्मानामुळे वाहतूक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *