पुणे: श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावरील माघ शुद्ध दशमी सोहळ्यानिमित्त शुक्रवार दि. २३ ते शनिवार दि. ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत भंडारा डोंगराच्या पायथ्याशी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात श्रीसंत ज्ञानेश्वर महाराजांचा ७५० वा जन्मोत्सव, श्रीसंत जनार्दन पंत देशपांडे देवगिरी यांचा ४५० वा संजीवन समाधी सोहळा, संत नामदेव, संत जनाबाई व अन्य १४ संतांचा ६७५ वा समाधी सोहळा, श्रीसंत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा ३७५ वा सदेह वैकुंठगमन सोहळा, श्रीसंत सावता महाराजांचा ७७५ वा जन्मोत्सव तसेच श्री तपोनिधी नारायण महाराज देहूकर यांचा ३७५ वा जन्मोत्सव साजरा होणार आहे.
सप्ताह काळात प्रतिदिनी सुमारे ५ हजार गाथा वाचक, १ हजार टाळकरी, श्री ज्ञानेश्वरीतील प्रत्येक ओवीसाठी एक वाचक या प्रमाणे ९,०३२ वाचक, प्रतिदिन २५ मृदंगवादक सहभागी होणार असून २४ तास अखंड श्री ज्ञानदेव व श्री तुकाराम महाराजांचा भजन प्रहर होणार आहे. शनिवार दि. ३० जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी समस्त मुळशी तालुक्याच्या वतीने सुमारे १ लाख भाविकांसाठी पुरणपोळी भोजन (महाप्रसाद) देण्यात येणार आहे.

या सप्ताहाचे आयोजन देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थान, श्रीक्षेत्र भंडारा डोंगर संस्थान (मावळ), श्रीक्षेत्र घोरावडेश्वर डोंगर व श्रीक्षेत्र भामचंद्र डोंगर यांच्या सहकार्याने करण्यात आले आहे. सप्ताह काळात दररोज काकडा आरती, गाथा व ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, संत चरित्रकथा, कीर्तन, भजन तसेच वारकऱ्यांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. दररोज सकाळी व सायंकाळी कीर्तन सेवा होणार आहे.
दि. २२ जानेवारी २०२६ रोजी शांतिब्राह्म मारोती कुऱ्हेकर यांच्या कीर्तनाने सप्ताहाची सुरुवात होणार आहे. वसंत पंचमीच्या दिवशी हभप बंडातात्या कराडकर यांचे कीर्तन होईल. त्यानंतर रामायणाचार्य संजय महाराज पाचपोर, हभप जयवंत महाराज बोधले, हभप चैतन्य महाराज देगलूरकर, हभप अच्युत महाराज दस्तापुरकर, श्रीगुरु केशव महाराज नामदास आदी नामवंत कीर्तनकारांची सेवा होणार आहे. शनिवारी सकाळी ९ वाजता हभप ज्ञानेश्वर माऊली महाराज कदम यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे.

या निमित्ताने पूर्व हवेली तालुक्यातील उरुळी कांचन (ता. हवेली) येथे निमंत्रण पत्रिका व संवाद बैठक पार पडली. बैठकीस पूर्व हवेली तालुक्यातील वारकरी संप्रदायातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी श्री राम मंदिर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त विनोद (काका) कांचन, हभप दत्तात्रय चौधरी, हभप तुषार महाराज चौधरी, हभप अक्षय महाराज रोडे, तुकाराम कांचन, प्रशांत भोर, प्रतिभा कांचन, बबनराव साठे, सरपंच बजरंग म्हस्के, दिपक कांचन, बाबासाहेब गायकवाड, गणेश म. जगताप, नारायण नाना कुंजीर, बंडूशेठ अभंग, एल. बी. म्हस्के, रामभाऊ महाडिक, अशोक कारंडे, नितीन कड आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक हभप आनंद महाराज तांबे यांनी केले. ‘सकल संत वारकरी सप्ताहच्या व्यासपीठावरून एक एकी साह्य करू, अवघे धरू सुपंथ हा संदेश जगासमोर ठेवायचा आहे,’ असे त्यांनी सांगितले. आभार हभप विनायक महाराज कांचन यांनी मानले.
ही माहिती सोहळ्याचे संयोजक हभप ज्ञानेश्वर माऊली महाराज कदम यांनी दिली.