पुणे: थेऊर–कोलवडी नदी पुलावरून नदीपात्रात उडी मारून आत्महत्या करण्याच्या तयारीत असलेल्या एका महिलेचा लोणी काळभोर पोलिसांनी प्रसंगावधान राखत जीव वाचविला. बुधवारी (ता. ९) सायंकाळी सुमारे पाचच्या सुमारास ही घटना घडली.

लोणी काळभोर पोलिस ठाण्याअंतर्गत थेऊर पोलिस चौकीत एक नागरिक धावत येऊन, थेऊर–कोलवडी नदी पुलावर एक महिला आत्महत्येच्या मन:स्थितीत उभी असल्याची माहिती दिली. माहिती मिळताच महिला पोलिस अंमलदार (पो.हवा. ६११७) वैशाली नागवडे तसेच मार्शल कर्तव्यावर असलेले पोलिस शिपाई ताम्हाणे व घुले तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पुलावरून नदीपात्रात उडी मारण्याच्या तयारीत असलेल्या महिलेला त्यांनी तत्काळ ताब्यात घेतले व थेऊर पोलिस चौकीत आणले.

चौकशीत सदर महिलेने आपले नाव वैष्णवी सुरेश पांडागळे (वय २६, रा. भाडळे वस्ती, कोलवडी, ता. हवेली, जि. पुणे) असे सांगितले. तिचे पती सुरेश पांडागळे यांना चौकीत बोलावून घेण्यात आले. आर्थिक अडचणींमुळे आत्महत्या करण्याचा विचार केल्याचे महिलेने सांगितले.

यानंतर पोलिस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के व महिला पोलिस हवालदार वैशाली नागवडे यांनी पती-पत्नीचे समुपदेशन करून त्यांना आत्महत्येपासून परावृत्त केले.

आवश्यक समजावणूक केल्यानंतर सदर महिलेला पतीच्या ताब्यात देऊन सुखरूप घरी पाठविण्यात आले.
महिला पोलिस अंमलदारांनी दाखविलेल्या कर्तव्य तत्परतेमुळे एका महिलेचा अनमोल जीव वाचला आहे.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के, पो.हवा. वैशाली नागवडे, पोलिस शिपाई ताम्हाणे, घुले, महिला पोलिस शिपाई कदम, मपोशि खोत व मपोशि पोळ यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *