पुणे : मुंबईतील मलबार हिल येथील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत राज्य निवडणूक आयोगाने मोठी घोषणा केली आणि राज्यातील राजकारण तापलं आहे. १२ जिल्ह्यांत जिल्हा परिषद आणि तब्बल १२५ पंचायत समितींच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या असून, यामुळे गावागावात निवडणुकीचा धुरळा उडणार आहे.
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं की, “सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ज्या ठिकाणी ५० टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण आहे, अशा जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश आहेत. त्यानुसारच ही निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे.”

या १२ जिल्ह्यांत होणार जिल्हा परिषद निवडणुका
रायगड
रत्नागिरी
सिंधुदुर्ग
पुणे
सातारा
सांगली
कोल्हापूर
सोलापूर
छत्रपती संभाजीनगर
परभणी
धाराशीव
लातूर
मतदाराला दोन मते – एकाच दिवशी दुहेरी लढत
प्रत्येक मतदाराला
१ मत जिल्हा परिषदेसाठी
१ मत पंचायत समितीसाठी
देण्याचा अधिकार असणार आहे.
नामनिर्देशन प्रक्रिया ऑफलाइन असेल आणि ती महापालिका निवडणुकांप्रमाणेच राबवली जाणार आहे.

राखीव जागांसाठी कडक नियम
राखीव जागांवर लढणाऱ्या उमेदवारांना जातवैधता पडताळणी अनिवार्य
उमेदवारी अर्जासोबत जातप्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक
प्रमाणपत्र नसेल तर जातपडताळणी समितीकडे अर्ज केल्याची सत्यप्रत द्यावी लागणार
निवडून आल्यानंतर ६ महिन्यांत जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास निवड रद्द!
निवडणूक वेळापत्रक जाहीर
नामनिर्देशन अर्ज स्वीकारणे: १६ जानेवारी ते २१ जानेवारी
छाननी: २२ जानेवारी
उमेदवारी माघारी घेण्याची अंतिम तारीख: २७ जानेवारी
अंतिम उमेदवार यादी व चिन्ह वाटप: २७ जानेवारी, दुपारी ३.३० नंतर
मतदान: ५ फेब्रुवारी
मतमोजणी: ७ फेब्रुवारी, सकाळी १० वाजल्यापासून
एकूणच काय तर—गावपातळीवरील सत्तासंघर्ष पुन्हा एकदा पेटणार असून, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांनी राज्याचं ग्रामीण राजकारण ढवळून निघणार आहे!