पुणे : आपली देवालये ही केवळ निर्जीव वास्तू किंवा संग्रहालयातील कलावस्तू नाहीत, तर भारतीय ज्ञानपरंपरा, सांस्कृतिक, सामाजिक, साहित्यिक, कलात्मक तसेच आर्थिक जीवनाचे जिवंत व चैतन्यपूर्ण केंद्र आहेत. त्यामुळे अशा प्राचीन वारसास्थळे आणि देवालयांना फक्त ‘मॉन्युमेंट’ किंवा ‘म्युझियम’ या संज्ञांपुरते मर्यादित करू नये, असे कळकळीचे आवाहन ‘बोध’ या थिंक टँकचे सह-संस्थापक, भारतीय शिक्षण व तत्त्वज्ञानाचे अभ्यासक पंकज सक्सेना यांनी केले.
देशाचा सामाजिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचावा तसेच भारतीय ज्ञानप्रणालींच्या सखोल पैलूंचे आकलन व्हावे, या उद्देशाने पुण्यातील नेशन फर्स्ट व चाणक्य मंडल परिवार यांच्या वतीने ‘भारत विमर्श’ या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या उपक्रमातील पहिल्या कार्यक्रमात सक्सेना बोलत होते. बंगलोर–मुंबई महामार्गावरील बाणेर येथील बंटारा भवनच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. सर्वांसाठी मुक्त प्रवेश असलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली.
यावेळी पुणे महानगर जनजाती कल्याण आश्रमाचे अध्यक्ष व इंडस्ट्रियल मेटल पावडर्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश धोका, प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ व लेखक डॉ. मिलिंद मोडक, कर्नल नंदू कोरेगावकर, शिक्षणतज्ज्ञ डॉ. वासुदेव आयटल, आझाद हिंद फोर्स इम्फाळ फ्रंटचे संस्थापक सदस्य प्रेमानंद शर्मा, तमिळ साहित्यातील विद्वान जटायू, नेशन फर्स्टचे संस्थापक सुनील भोसले, सर जदुनाथ सरकार फेलोशिप फॉर इंडियन हिस्ट्रीचे रिसर्च फेलो अमृतांशु पांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच प्रसिद्ध मूर्तीशास्त्रज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर, इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, निवृत्त ब्रिगेडियर संग्राम दळवी, नांदेड सिटीचे संचालक नरसिंग लगड, ‘एक भारत हम भारत’ संस्थेच्या अनुराधा गोखले, सैन्यदल, वैद्यकीय, उद्योजक क्षेत्रातील मान्यवर आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी डॉ. गो. बं. देगलूरकर आणि पांडुरंग बलकवडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
सक्सेना म्हणाले, “आधुनिक हिंदू समाजाने आपल्या प्राचीन आणि समृद्ध सभ्यतेशी नव्याने नाते जोडणे आवश्यक आहे. हिंदू या संज्ञेच्या निर्भय उच्चारणास सुरुवात झाली असून संपूर्ण देशात हिंदू चैतन्याची लहर दिसते आहे. मात्र हे चैतन्य केवळ राजकीय क्षेत्रापुरते न राहता सामाजिक, सांस्कृतिक, कलात्मक, साहित्यिक आणि आर्थिक क्षेत्रांतही प्रवाहित व्हावे. ‘भारत विमर्श’ ही त्या दिशेने टाकलेली पायरी आहे.”
‘भारत विमर्श’ अंतर्गत पहिल्या सत्रात ‘देवालय’ या विषयावर पंकज सक्सेना, लेखिका व देवालय अभ्यासक मोनिदीपा बोस-डे आणि लेखक व इंडियन नॉलेज सिस्टीम उपक्रमाचे सदस्य रामकृष्ण कोंगाल्ला यांनी विचार मांडले.

मंदिरांची उभारणी केवळ दर्शनासाठी नव्हे, तर तत्त्वविचार, जीवनमूल्ये, नीतिमत्ता, कला आणि सत्याचे दर्शन घडवण्यासाठी झाली आहे. देवालयांनी एक सर्वव्यापी अशी इकोसिस्टीम निर्माण केली व विकसित केली, असे मत सक्सेना यांनी व्यक्त केले. ही इकोसिस्टीम पुन्हा सशक्त व्हावी आणि मंदिरांचे मूळ स्वरूपात पुनर्निर्माण व्हावे, असेही ते म्हणाले.
मोनिदीपा बोस म्हणाल्या, “मंदिरे, गोपुरे, शिल्पे, चित्रे आणि वास्तु आरेखन यातून आपल्या इतिहासाचे जणू दस्तऐवजीकरण झाले आहे. प्रत्येक मूर्ती व शिल्पामागे अर्थ आणि संदेश असून मंदिरांची उभारणी शास्त्राधारित आहे.”
रामकृष्ण कोंगाल्ला यांनी सांगितले की, मंदिर स्थापत्य, शिल्पकला आणि मूर्तीविज्ञान या क्षेत्रांत आपल्या पूर्वजांनी गाठलेली उंची आश्चर्यकारक आहे. भारतीय पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीतील सुमारे साडेतीन हजार वास्तूंमध्ये तब्बल तीन हजार मंदिरांचा समावेश आहे, हीच बाब मंदिरांचे सर्वांगीण महत्त्व अधोरेखित करते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संयुक्ता भोसले यांनी केले.