पुणे : आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान, पुरंदर संचलित न्यू इंग्लिश स्कूल, अष्टापूर येथे ‘आनंददायी शनिवार’ उपक्रमांतर्गत आनंदी बाजार उत्साहात पार पडला. या उपक्रमाचे उद्घाटन शाळा समितीचे अध्यक्ष श्रीहरी कोतवाल यांच्या हस्ते, स्कूल कमिटीचे सदस्य व गावातील मान्यवरांच्या उपस्थितीत फीत कापून करण्यात आले.
या आनंदी बाजारात इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी आपल्या स्टॉलवर भाजीपाला, फळे तसेच विविध घरगुती पदार्थांची विक्री केली. प्रत्यक्ष खरेदी-विक्रीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नाणी व नोटांची ओळख, व्यवहार कौशल्य, बेरीज-वजाबाकी यांसारख्या गणिती संकल्पनांचा अनुभव मिळाला.

विद्यार्थ्यांनी ग्राहकांशी संवाद साधत उत्स्फूर्तपणे विक्री केली आणि आत्मविश्वास दाखविला. पालक व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेऊन विद्यार्थ्यांनी विक्रीसाठी ठेवलेल्या वस्तू खरेदी केल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण झाली. स्थानिक उत्पादनांची ओळख करून देणे व श्रमाचे महत्त्व पटवून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन, नेतृत्वगुण व संवादकौशल्ये विकसित होत असल्याचे मत मुख्याध्यापक सुभाष काळे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान पुरंदरचे अध्यक्ष विजय कोलते, सचिव शांताराम पोमण, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप, नियामक मंडळ सदस्य रमेश कोतवाल, अष्टापूरच्या सरपंच पुष्पा कोतवाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मुख्याध्यापक सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सुभाष काळे यांनी केले. सूत्रसंचालन सहशिक्षक बाळासाहेब ढवळे यांनी केले, तर आभार अनिल कुंजीर यांनी मानले.