पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक प्रचाराला शिवसेनेला मोठा प्रतिसाद मिळाल्याचा दावा शिवसेनेचे उपनेते व राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी केला आहे. प्रचाराच्या सांगतेनंतर त्यांनी पुणे व पिंपरी-चिंचवडमधील मतदारांना खुले पत्र लिहून आभार मानले आहेत.

या पत्रात सामंत यांनी स्पष्ट केले आहे की, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये महायुतीसाठी प्रयत्न झाले होते. मात्र, काही पक्षांच्या सत्ताकेंद्रित भूमिकेमुळे शिवसेनेने पुण्यात स्वतंत्रपणे, तर पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेससोबत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. “शिवसेनेने आपली हिंदुत्ववादी विचारधारा आणि विकासाभिमुख भूमिका कायम ठेवत संयत आणि सकारात्मक प्रचार केला,” असे त्यांनी नमूद केले.

प्रचारादरम्यान शिवसेनेच्या तरुण, प्रामाणिक आणि काम करण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांना नागरिकांकडून मोठा पाठिंबा मिळाल्याचे सामंत यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभा आणि रोड शोला मिळालेला प्रचंड प्रतिसाद हा जनतेच्या विश्वासाचे प्रतीक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महानगरपालिकांमध्ये शिवसेना निर्णायक भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पुणे ही राज्याची सांस्कृतिक राजधानी असून आयटी, उद्योग आणि शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र असल्याचे सांगत, आगामी काळात मेट्रो, विमानतळ, रिंग रोडसारख्या मोठ्या पायाभूत प्रकल्पांसह पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन आणि सांडपाणी शुद्धीकरण यांसारख्या मूलभूत सुविधांना प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाहीही उदय सामंत यांनी दिली.