पुणे : महात्मा गांधी सर्वोदय संघ संचलित महात्मा गांधी विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन मंगळवार, १३ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता डॉ. सायरस पुनावाला इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडले. उरुळी कांचन ग्रामीण विकास प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने उपलब्ध करून दिलेल्या व्यासपीठावर हा कार्यक्रम संपन्न झाला.
नियोजनबद्ध व रंगतदार स्नेहसंमेलनात इयत्ता ५ वी ते ९ वीच्या विद्यार्थ्यांनी विविध कला सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे विश्वस्त खजिनदार व उरुळी कांचन ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजाराम कांचन यांच्या हस्ते झाले.

विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांचा विकास होणे आवश्यक असून प्रत्येकाने आपली कला व्यासपीठावर सादर करावी, असे त्यांनी यावेळी सांगितले. सहभागी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे त्यांनी मनापासून कौतुक केले. विद्यालयाचे प्राचार्य भारत भोसले यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडतो, असे मत व्यक्त केले.

स्नेहसंमेलनात पाचशेपेक्षा अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. गणेश वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर महाराष्ट्राची लोकधारा, शेतकरी गीत, कोळीगीत, जेजुरीचा खंडोबा, लोकगीते, छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांचा इतिहास, गोंधळ, भारुड, पर्यावरण गीत तसेच मराठी शाळेविषयी अभिमान व्यक्त करणारी नृत्ये सादर करण्यात आली. प्रत्येक सादरीकरणाने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.
यावेळी गावातील मान्यवर ग्रामस्थ, पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपप्रमुख विलास काशीद, सर्व पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला उत्स्फूर्त दाद दिली. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन सत्यवान जगताप यांनी केले. सूत्रसंचालन विक्रांत पंडित व स्वाती कांचन
यांनी केले. सांस्कृतिक विभाग प्रमुख व पर्यवेक्षिका संगीता शिर्के यांनी आभार मानले.