पुणे : पुणे ब्रदरहुड फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेली शंभला ब्रदरहुड प्रीमियर लीग (BPL) क्रिकेट स्पर्धा अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात यशस्वीपणे संपन्न झाली. एएफके, खडकी येथील मैदानावर दिवस-रात्र प्रकाशझोतात पार पडलेल्या या स्पर्धेने खेळाडूंसह प्रेक्षकांचेही मन जिंकले.

पुरुष गटात सनराईज गणराज जायंट्स संघाने शानदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले, तर बी अँड बी बॅशर्स संघ उपविजेता ठरला. महिला गटात पीकेजी येरवडा स्ट्रायकर्स संघाने विजेतेपदावर आपले नाव कोरले, तर पीकेजी प्राधिकरण पँथर्स संघ उपविजेता ठरला. पुरुष गटातील सात आणि महिला गटातील चार संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. तीन दिवस चाललेल्या चुरशीच्या सामन्यांमध्ये खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे दर्शन घडवले.

स्पर्धेसोबतच आयोजित करण्यात आलेल्या भव्य कार्निव्हलमुळे क्रीडासोबत मनोरंजनाचाही अनोखा संगम पाहायला मिळाला. विविध खेळ, खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि उपक्रमांमुळे संपूर्ण परिसर उत्सवमय झाला होता.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अरुण ठाकूर (चीफ इंजिनिअर, खडकी अ‍ॅम्युनिशन फॅक्टरी) उपस्थित होते. या यशस्वी आयोजनाचे श्रेय ब्रदरहुडचे सीएमडी ईश्वरचंद गोयल, चेअरमन संदीप अग्रवाल, उप-चेअरमन अजय जिंदल, अध्यक्ष सागर अग्रवाल, सचिव कर्नल नरेश गोयल तसेच संचालक मंडळ व संपूर्ण कार्यकारिणीला जाते.

वैयक्तिक पुरस्कारांमध्ये सर्वोत्तम खेळाडू आणि सर्वोत्तम चॅम्पियन खेळाडू म्हणून प्रमोद अग्रवाल, सर्वोत्तम फायटर खेळाडू व चॅम्पियन फलंदाज म्हणून अजय जिंदल, सर्वोत्तम फायटर फलंदाज पवन बन्सल, सर्वोत्तम चॅम्पियन क्षेत्ररक्षक सीए योगेश पोद्दार आणि सर्वोत्तम चॅम्पियन गोलंदाज आदित्य अग्रवाल यांना गौरविण्यात आले.

शंभला ब्रदरहुड प्रीमियर लीगने मैत्री, क्रीडा भावना आणि संघभावनेचा सुंदर आदर्श घालून दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *