पुणे : कोरेगावमूळ पंचायत समिती गणातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी कोणाला मिळणार, यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नायगाव पेठ येथील श्री काळभैरवनाथ परिवर्तन ग्रुपने थेट उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना सविनय निवेदन देत सुरज भालचंद्र चौधरी यांनाच उमेदवारी देण्याची ठाम मागणी केली आहे.
परिवर्तन ग्रुपने स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, सुरज चौधरी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी निष्ठावान कार्यकर्ते असून कोविड काळात त्यांनी किराणा किट वाटप, वैद्यकीय मदत, शैक्षणिक साहित्य वाटप यांसारखी कामे प्रभावीपणे केली आहेत. त्यामुळे ते केवळ उमेदवार नाहीत, तर जनतेत रुजलेले नेतृत्व आहेत.

नायगाव ग्रामपंचायतीतील ११ पैकी ८ सदस्य, नायगाव ग्रामीण पतसंस्थेचे संचालक मंडळ, श्री काळभैरवनाथ प्रसादिक दिंडी विश्वस्त मंडळ, यशवंत पाणीपुरवठा संस्था, ग्राम विकास मंडळ, विकास सोसायटीतील संचालक, परिवर्तन ग्रुपचे सदस्य तसेच गावातील तरुण मंडळांचा जाहीर पाठिंबा सुरज चौधरी यांना असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, परिवर्तन ग्रुपने स्पर्धक उमेदवारांवर थेट बोट ठेवत ते भाजपामध्ये सक्रिय असून गणाबाहेरील असल्याचा आरोप केला आहे. “गणातील मतदारांना गणातीलच उमेदवार हवा आहे,” अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतल्याचेही या निवेदनातून स्पष्ट करण्यात आले आहे.

याचबरोबर, “कोरेगावमूळ गणाबाहेरील बलस्थान असलेल्या नेत्यांच्या शिफारशी उमेदवारी ठरवताना घेऊ नयेत,” असा स्पष्ट आणि आक्रमक सूर परिवर्तन ग्रुपने लावला आहे. स्थानिक नेते, कार्यकर्ते आणि सामान्य मतदारांच्या इच्छेला प्राधान्य देत सुरज चौधरी यांनाच उमेदवारी द्यावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.
माननीय शरदचंद्र पवार साहेब आणि अजितदादा पवार तसेच शिरूर हवेली आमदार ज्ञानेश्वर (माऊली) कटके यांच्यावर नायगाव पेठ ग्रामस्थांचे विशेष प्रेम असून मागील विधानसभा निवडणुकीत पूर्व हवेली मतदारसंघातून पक्षाला उच्चांकी मतदान मिळाले होते, याची आठवण करून देत परिवर्तन ग्रुपने पक्षाने ही बाब गांभीर्याने घ्यावी, असा स्पष्ट संदेश दिला आहे.
या निवेदनावर राजेंद्र रतन चौधरी आणि कृष्णा आप्पा चौधरी यांच्या स्वाक्षऱ्या असून, आता राष्ट्रवादी काँग्रेस नेतृत्व नेमका काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण गणाचे लक्ष लागले आहे.