पुणे : पुणे–सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन हद्दीत भरधाव वेगाने व वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून चालविलेल्या दुचाकीचा अपघात होऊन मागे बसलेल्या प्रवाशाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणी दुचाकी चालकाविरुद्ध उरुळी कांचन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना शुक्रवारी (ता. १७) दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास विश्व पेट्रोल पंपासमोर, पुणे–सोलापूर महामार्गावर घडली. आकाश दिनेशकुमार राणा (वय २१, रा. लक्ष्मीनगर, पर्वती, पुणे, मूळ रा. राजस्थान) हा त्याच्या ताब्यातील सुझुकी अ‍ॅक्सेस (क्र. एम एच १२ टी एल ६९०८) या दुचाकीवरून नंदु बहरैची कुमार (वय ५५) यांना पाठीमागे बसवून जात होता.

भरधाव वेगात दुचाकी चालवित असताना अचानक मागे बसलेला प्रवासी जोरात हलल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. परिणामी दुचाकीचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यावर कोसळली. या अपघातात नंदु कुमार यांच्या डोक्याला व पोटाला गंभीर दुखापत झाली. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

अपघातात दुचाकीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याप्रकरणी फिर्यादी संतोष लक्ष्मण झोंबाडे (वय ३५, व्यवसाय – ॲम्ब्युलन्स चालक, रा. उरुळी कांचन) यांनी दिलेल्या तक्रारीवरून आकाश राणा याच्याविरुद्ध उरुळी कांचन पोलिस ठाण्यात निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी नागरिकांना वाहन चालविताना वेगमर्यादा व वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *