पुणे : आध्यात्मिक व सामाजिक क्षेत्रात गेल्या तीन दशकांहून अधिक काळ उल्लेखनीय कार्य करणारे, तसेच आजपर्यंत अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित झालेले महानुभाव संप्रदायातील महंत श्री. गोपालव्यास कपाटे यांना शिवजयंतीच्या निमित्ताने पुणे येथे मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

स्वराज्य फिल्म प्रॉडक्शन संघटना महाराष्ट्र राज्य व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चित्रपटसृष्टीचे जनक कलावंत दादासाहेब फाळके व सह्याद्रीरत्न पुरस्कार सोहळा–२०२६ या भव्य समारंभात हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा १९ फेब्रुवारी २०२६ रोजी आचार्य अत्रे सभागृह, संत तुकाराम नगर, पिंपरी-चिंचवड, पुणे येथे होणार आहे.
जनहिताच्या कार्यासोबतच अध्यात्मिक क्षेत्रात दिलेल्या मोलाच्या योगदानाची दखल घेत महंत श्री. कपाटे यांना आध्यात्मिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती कार्यक्रमाचे मुख्य आयोजक प्रा. गिरीष राजूरकर, मंगेश कसबे, सिद्धांत शिंदे व राजेंद्र ठोंबरे यांनी दिली.

या सोहळ्याचे उद्घाटन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते होणार असून आमदार पै. महेशदादा लांडगे, उपमहापौर निर्मलाताई गायकवाड यांच्यासह चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, गायन क्षेत्रातील नामवंत कलाकार, आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर, अभिनेते-अभिनेत्री तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक प्रमुख व्यक्ती या वेळी उपस्थित राहणार आहेत.
शिवजयंतीच्या पावन पर्वावर होणारा हा पुरस्कार सोहळा सामाजिक, सांस्कृतिक व अध्यात्मिक क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.