पुणे : पुणे जिल्हा परिषद निवडणुकीचे बिगुल वाजताच हवेली तालुक्यात राजकीय वातावरण तापले असून प्रत्येक पक्षाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. अशातच शिवसेना (शिंदे गट) यांनी आक्रमक पवित्रा घेत विश्वासात न घेतल्यास निवडणूक स्वबळावर लढण्याची स्पष्ट भूमिका जाहीर केल्याने हवेलीतील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. जिल्हासंघटक नीलेश काळभोर यांनी ही माहिती देत, येत्या दोन दिवसांत उमेदवारांची नावे निश्चित केली जातील, असे ठामपणे सांगितले आहे.

हवेली तालुक्यातील लोणी काळभोर–कदमवाकवस्ती–वडकी या जिल्हा परिषद गटासाठी अनुसूचित जाती महिला असे आरक्षण जाहीर झाले असून, या गटावर वर्चस्व मिळवण्यासाठी सर्वच पक्षांनी हालचाली वेगवान केल्या आहेत. त्याचबरोबर लोणी काळभोर पंचायत समिती गणासाठी इतर मागासवर्गीय महिला, तर कदमवाकवस्ती पंचायत समिती गणासाठी अनुसूचित जाती असे आरक्षण घोषित झाल्याने इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

शिंदे गटाकडून या निवडणुकीकडे प्रतिष्ठेची लढाई म्हणून पाहिले जात असून, संघटनात्मक ताकदीच्या जोरावर मैदान मारण्याचा निर्धार करण्यात आला आहे. “हवेली तालुक्यात शिवसेनेची मजबूत बांधणी असून कार्यकर्ते पूर्ण ताकदीने रिंगणात उतरतील. योग्य, सक्षम आणि जनतेशी थेट नातं असलेले उमेदवारच दिले जातील,” असा ठाम विश्वास जिल्हासंघटक नीलेश काळभोर यांनी व्यक्त केला.
दरम्यान, उमेदवार कोण असणार याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू असून, शिवसेना शिंदे गटाच्या निर्णयाकडे विरोधकांचे लक्ष लागले आहे. स्वबळावर निवडणूक लढण्याच्या या घोषणेमुळे युती-आघाडींच्या गणितांनाही धक्का बसण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत हवेली तालुक्यातील राजकारण आणखी तापणार, हे मात्र निश्चित.