पुणे : उरुळी कांचन–सोरतापवाडी जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीत अखेर भाजपने आपली अंतिम खेळी उघड केली असून, उमेदवारीच्या शेवटच्या दिवशी झालेल्या नाट्यमय घडामोडींनी संपूर्ण पंचक्रोशीतील राजकारण ढवळून निघाले आहे. दिवसभर बंद दाराआड सुरू असलेल्या बैठका, रस्सीखेच आणि तर्कवितर्कांच्या फैरी झडल्यानंतर अखेर भाजपचे अधिकृत कमळ विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शंकर बडेकर यांच्या हाती देण्यात आले. या निर्णयामुळे चर्चांना पूर्णविराम मिळाला असून विरोधक क्षणभर गाफील पडल्याचे चित्र आहे.

सकाळपासून विविध नावांची चर्चा रंगली होती. शेवटच्या क्षणी ‘चमत्कार’ होणार, अशीही कुजबुज होती. मात्र भाजपने नेहमीच्या आक्रमक पण संयमी शैलीत योग्य क्षणाची वाट पाहिली आणि ऐन वेळी बडेकरांच्या नावावर शिक्कामोर्तब करत राजकीय डाव टाकला.
तळागाळात मजबूत पकड, गावागावातील दांडगा जनसंपर्क, संघटनात्मक कामाचा अनुभव आणि स्थानिक प्रश्नांवर ठाम भूमिका ही बडेकरांची बलस्थाने मानली जात असून त्यामुळेच ते भाजपसाठी ‘सेफ बेट’ ठरल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, उमेदवारी जाहीर होण्याआधीच उरुळी कांचन, शिंदवणे, तरडे, सोरतापवाडी, टिळेकरवाडी आदी गावांतील नागरिक, पुढारी आणि सर्वपक्षीय नेतेमंडळींनी बडेकरांच्या समर्थनात एकवटले होते. उरुळी कांचन येथील हॉटेल सोनाई येथे झालेल्या बैठकीत “ स्वच्छ प्रतिमा, तळागाळात काम करणारा आणि विकासाची दृष्टी असलेला उमेदवार हवा” अशी स्पष्ट भूमिका मांडण्यात आली. या निकषांवर शंकर बडेकरच योग्य उमेदवार असल्यावर एकमत झाले होते.
उमेदवारी जाहीर होताच समर्थकांनी जल्लोष केला असून परिसरात उत्साहाचे वातावरण आहे. दुसरीकडे विरोधी गटात अस्वस्थता स्पष्ट दिसते. भाजपने उरुळी कांचन गटात आक्रमक पवित्रा घेतल्याने ही निवडणूक आता प्रतिष्ठेची लढाई ठरणार हे निश्चित आहे.
येत्या काळात प्रचाराचा रणसंग्राम तापणार असून, उरुळी कांचनचा निकाल तालुक्याच्या राजकारणाची दिशा ठरवणारा ठरेल, हे नक्की.