पुणे : उरुळी कांचन येथील महात्मा गांधी सर्वोदय संघ संचलित पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण कार्यक्रम ‘मणिफेस्ट २०२६’ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

यावेळी छत्रपतींचे छावा संभाजी महाराजांचा अत्यंत करुण वध तसेच सारीपाटात पराभूत पांडवांची द्रौपदीचे भरसभेत झालेले वस्त्रहरण या हृदयद्रावक प्रसंगांचे प्रभावी नाट्यरूप सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. अन्याय, अत्याचार, सत्तेची दडपशाही, स्त्री-अस्मितेवरील आघात आणि आत्मसन्मानाचा संघर्ष या विषयांचे विचारप्रवर्तक दर्शन या सादरीकरणांतून घडले.

कार्यक्रमाचे उद्घाटन महात्मा गांधी सर्वोदय संघाचे विश्वस्त महादेव कांचन व संभाजीराव कांचन यांच्या हस्ते नटराज पूजन, मणिभाई देसाई प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने झाले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी बोऱ्हाडे होते.

व्यासपीठावर कला विभाग प्रमुख डॉ. समीर आबनावे, संगणकशास्त्र विभाग प्रमुख प्रा. वैशाली चौधरी, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. शुभांगी धुमाळ, प्रा. प्रतिक आढाव आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या विविध गुणदर्शन कार्यक्रमांत संभाजी महाराजांचे तेजस्वी, अन्यायासमोर न झुकणारे व्यक्तिमत्त्व सशक्त अभिनयातून उभे राहिले. द्रौपदी वस्त्रहरणाच्या प्रसंगात सभागृहातील मौन, स्त्री-अस्मितेवर झालेला अन्याय आणि न्यायाची आस यांचे विदारक चित्रण झाले.

यावेळी बोलताना महादेव कांचन यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत सांस्कृतिक, क्रीडा व सामाजिक उपक्रमांत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. विश्वस्त संभाजीराव कांचन यांनी इतिहास व पौराणिक कथांकडे केवळ कथा म्हणून न पाहता त्यातून शिस्त, साहस, आत्मसन्मान व न्यायनिष्ठा ही मूल्ये आत्मसात करण्याचे महत्त्व सांगितले.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. शिवाजी बोऱ्हाडे यांनी महाविद्यालय हे केवळ पदवी मिळविण्याचे ठिकाण नसून विचार, मूल्ये व नेतृत्व घडविण्याचे केंद्र असल्याचे नमूद करत विद्यार्थ्यांनी समाजहितासाठी शिक्षणाचा उपयोग करावा, असे आवाहन केले.

कार्यक्रमात गणेश वंदना, आई जगदंबे, दाक्षिणात्य गीते, धुरंधर गीत, लावणी, देशी गर्ल्स-बॉइज, महिला सबलीकरण, फनी डान्स, रीमिक्स, हॉरर डान्स, कपल डान्स आदी विविध समूह व वैयक्तिक नृत्यांचे सादरीकरण झाले. या सादरीकरणाचे प्राचार्य, प्राध्यापकवृंद व उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले.

वर्षभरात विविध क्षेत्रांत नैपुण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्हे व पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. विविध गुणदर्शन स्पर्धेत प्रथम क्रमांक भारती चौधरी व ग्रुप (तृतीय वर्ष वाणिज्य) – हॉरर डान्स, द्वितीय क्रमांक शंभूराज लोखंडे व ग्रुप (संगणकशास्त्र विभाग) – ‘छावा’, तृतीय क्रमांक तृप्ती काळे व ग्रुप (प्रथम वर्ष कला) – ‘आई जगदंबे’ यांना मिळाला. वैयक्तिक नृत्यात प्रथम क्रमांक ऐश्वर्या लोखंडे (तृतीय वर्ष वाणिज्य) – लावणी यांना देण्यात आला.

स्नेहसंमेलनाध्यक्षा प्रा. सुजाता गायकवाड यांनी अहवाल वाचन केले. सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. शुभांगी धुमाळ यांनी आभार मानले.

सूत्रसंचालन प्रा. अनुजा झाटे यांनी केले. कार्यक्रमास पालक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल प्राचार्य डॉ. शिवाजी बोऱ्हाडे यांनी सर्व आयोजक, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांचे कौतुक करून विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *