पुणे : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीच लोणी काळभोर गटात राजकीय भूकंप झाला आहे. सत्तेत युतीत असलेले भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी एकमेकांविरोधात थेट उमेदवार उभे करत युतीचा मुखवटा फाडून टाकला आहे. त्यामुळे लोणी काळभोर जिल्हा परिषद गटाची निवडणूक चुरशीचीच नव्हे तर स्फोटक ठरण्याची चिन्हे आहेत.

लोणी काळभोर जिल्हा परिषद गट हा अनुसूचित जातीसाठी (महिला) राखीव असल्याने या जागेकडे सर्वच प्रमुख पक्षांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. भाजपकडून जिल्हा परिषद गटासाठी पूनम बाबुराव गायकवाड , लोणी काळभोर पंचायत समिती गणासाठी श्वेता कमलेश काळभोर , तर कदमवाकवस्ती पंचायत समिती गणासाठी ज्ञानेश्वर नामुगडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसनेही आक्रमक भूमिका घेत जिल्हा परिषद गटासाठी शीतल कांबळे , लोणी काळभोर पंचायत समिती गणासाठी रेश्मा काळभोर , तर कदमवाकवस्ती गणासाठी अमोल टेकाळे यांना रिंगणात उतरवले आहे.
दरम्यान, शिवसेना शिंदे गटानेही मैदान सोडलेले नाही. जिल्हा परिषद गटासाठी सिम्पल गणेश कांबळे , लोणी काळभोर पंचायत समिती गणासाठी नंदिनी हेमंत कोळपे , तर कदमवाकवस्ती गणासाठी विजय भागवत दाभाडे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

या साऱ्या राजकीय खेळीमध्ये आता महाविकास आघाडीही उतरण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. आघाडीकडून जिल्हा परिषद गटासाठी अनिता सूर्यकांत गवळी , लोणी काळभोर पंचायत समिती गणासाठी सुवर्णा काळभोर , तर कदमवाकवस्ती गणासाठी प्रकाश नारायण भिसे यांची नावे जोरदार चर्चेत आहेत.
गुरुवारी (दि. २२) होणाऱ्या उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर कोणाचे अर्ज वैध ठरतात, कोण बाद होतात आणि कोण माघार घेतात, यावरच लोणी काळभोर गटातील निवडणुकीचे अंतिम राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र सध्याची स्थिती पाहता लोणी काळभोर गटात येत्या काही दिवसांत राजकीय हालचालींना प्रचंड वेग येणार, हे मात्र नक्की.