पुणे : ऑनलाईन सायबर फसवणुकीत गेलेली २ लाख ८६ हजार ६८ रुपयांची संपूर्ण रक्कम लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या सायबर पथकाने तातडीच्या कारवाईत परत मिळवून दिल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे.
नोव्हेंबर २०२५ मध्ये कदमवाकवस्ती, लोणी काळभोर येथील रहिवासी महादेव महारुद्र कचरे (वय ५७) यांनी जुना अशोक लेलँड टेम्पो खरेदी केला होता. सदर खरेदीसाठी त्यांनी मन्नपुरम फायनान्स लिमिटेडकडून कर्ज घेतले होते. कर्जाच्या परतफेडीच्या अनुषंगाने अज्ञात इसमाने ऑनलाईन संपर्क साधून कर्ज रकमेवर काही टक्के सूट मिळवून देण्याचे आमिष दाखवले. विश्वास संपादन करून संबंधितांनी तक्रारदाराच्या बँक खात्यातून २,८६,०६८ रुपये अन्य बँक खात्यात ट्रान्सफर करून घेतले.

त्यानंतर तक्रारदार कर्ज खात्याची माहिती घेण्यासाठी मन्नपुरम फायनान्स कार्यालयात गेले असता सदर रक्कम कर्ज खात्यावर जमा न झाल्याचे स्पष्ट झाले. यावेळी आपली सायबर फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर तक्रारदारांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, यांनी तातडीने सायबर पथकाला फसवणूक झालेल्या रकमेचा शोध घेण्याचे आदेश दिले. आदेशानुसार सायबर पथकाने त्वरित तांत्रिक विश्लेषण, बँक व ई-मेलद्वारे पाठपुरावा करत संपूर्ण रक्कम शोधून काढली व ती तक्रारदारास परत मिळवून दिली.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तक्रारदारांनी पोलिस खात्याचे विशेष आभार मानले. ही कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उप आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे तसेच पो. हवा. देवीकर, पो. अंमलदार बाजीराव वीर आणि उषा थोरात यांनी केली.