पुणे : सोलापूर महामार्गावर प्रयागधाम फाट्याजवळ गुरुवारी (ता. २३) सकाळी भीषण अपघात झाला. भरधाव वेगातील स्कॉर्पिओ कार झाडावर आदळल्याने झालेल्या या अपघातात गोरख त्र्यंबक माने (रा. कंधर, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांचा जागीच मृत्यू झाला असून तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत समाधान अंकुश बाबर (वय 25, रा. कुगाव, ता. करमाळा) यांनी उरुळी कांचन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी, त्यांचे मामा विजय सूर्यकांत माने, चुलत मामा गोरख माने व व्यावसायिक भागीदार अलिकेश खान असे चौघे जण केळी एक्स्पोर्टच्या व्यवसायासंदर्भात मुंबई येथे मीटिंगसाठी गेले होते. काम आटोपून ते गुरुवारी पहाटे स्कॉर्पिओ (एम एच ४२/बीएस-३८५५) कारमधून गावाकडे परतत होते.

सकाळी सुमारे सातच्या सुमारास प्रयागधाम फाट्याजवळ कारवरील नियंत्रण सुटल्याने वाहन महामार्गाच्या डाव्या बाजूला जाऊन झाडावर आदळले. या अपघातात गोरख माने यांना डोके, चेहरा व शरीरावर गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर समाधान बाबर यांच्या पायाला फ्रॅक्चर व छातीला दुखापत झाली असून अलिकेश खान व चालक विजय माने हेही जखमी झाले आहेत.
जखमींवर उरुळी कांचन येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात चालक विजय सूर्यकांत माने यांनी निष्काळजीपणे व भरधाव वेगात वाहन चालवल्यामुळे झाल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. अपघातात स्कॉर्पिओ कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.