पुणे : कोरेगावमूळ–केसनंद जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीत भाजपने जोरदार आघाडी घेतल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. नायगाव परिसरात भाजपच्या उमेदवारांच्या पाठीशी युवकांची भक्कम फळी उभी राहिली असून, या निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

पंचायत समितीचे उमेदवार सुरज चौधरी यांना नायगावमधील तरुणांनी एकमुखी जाहीर पाठिंबा देत प्रचाराचा ताबा स्वतःकडे घेतला आहे.
नायगाव येथे झालेल्या युवकांच्या बैठकीत ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी परिसर अक्षरशः दणाणून सोडला. केवळ घोषणाबाजीपुरते मर्यादित न राहता युवकांनी घराघरांत पोहोचत प्रचार सुरू केला असून, भाजपचा संदेश तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार केला आहे.

अनेक वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अखेर मार्गी लागल्या असून, ५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
पूर्व हवेली भागात भाजपने ताकदीचा, विश्वासार्ह आणि कामाचा अनुभव असलेला उमेदवार सुरज चौधरी हे मैदानात उतरवले आहे. त्यामुळे विरोधकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे चित्र आहे. कोरेगाव मूळ–केसनंद मतदारसंघात गावोगावी युवक पुढाकार घेत असून, भाजपच्या प्रचाराला अभूतपूर्व वेग मिळाला आहे. “यावेळी बदल ठरलेलाच ” असा सूर तरुणांच्या बोलण्यातून उमटत आहे.
युवकांचा वाढता सहभाग, संघटित प्रचार आणि मैदानात दिसणारा उत्साह पाहता भाजपच्या उमेदवार सुरज चौधरी यांचा विजय जवळपास निश्चित असल्याचा दावा कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.
नायगावसह संपूर्ण परिसरात भाजपला मिळणारा प्रतिसाद सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे.