पुणे : आध्यात्मिक व सामाजिक क्षेत्रात गेल्या तीन दशकांहून अधिक काळ सातत्यपूर्ण, निस्वार्थ व प्रेरणादायी कार्य करणारे महंत श्री. गोपालव्यास कपाटे महानुभाव यांना चित्रपटसृष्टीचे जनक कलावंत दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. शिवजयंतीच्या पावन मुहूर्तावर मंगळवार, दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी पुणे येथे होणाऱ्या भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.

पुणे येथील स्वराज्य फिल्म प्रॉडक्शन संघटना (महाराष्ट्र राज्य) व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कलावंत दादासाहेब फाळके व सह्याद्रीरत्न पुरस्कार सोहळा २०२६’ या कार्यक्रमात आध्यात्मिक व सामाजिक क्षेत्रातील जनहितकारी योगदानाबद्दल महंत श्री. गोपालव्यास कपाटे यांचा गौरव केला जाणार आहे. हा सोहळा आचार्य अत्रे सभागृह, संत तुकाराम नगर, पिंपरी-चिंचवड (पुणे) येथे पार पडणार आहे.
समाजात अध्यात्माच्या माध्यमातून मूल्याधिष्ठित विचार रुजवणे, सामाजिक सलोखा निर्माण करणे, गरजू घटकांना मदतीचा हात देणे, युवकांना सन्मार्गाची दिशा देणे तसेच विविध सामाजिक उपक्रमांद्वारे जनजागृती करणे, या कार्यासाठी महंत श्री. गोपालव्यास कपाटे महानुभाव सर्वदूर परिचित आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत सदर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
या पुरस्कार सोहळ्याचे उद्घाटन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते होणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून आमदार पै. महेशदादा लांडगे, उपमहापौर निर्मलाताई गायकवाड यांच्यासह चित्रपटसृष्टीतील निर्माते, दिग्दर्शक, गायक-गायिका, अभिनेते-अभिनेत्री तसेच आध्यात्मिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाबाबत माहिती देताना मुख्य आयोजक प्रा. गिरीष राजूरकर, मंगेश कसबे, सिद्धांत शिंदे व राजेंद्र ठोंबरे यांनी सांगितले की, समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, महंत श्री. गोपालव्यास कपाटे यांचे कार्य समाजासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे.
दरम्यान, शिरूर–हवेलीचे लोकप्रिय आमदार मा. श्री. माऊलीआबा कटके यांच्या हस्ते महंत श्री. गोपालव्यास कपाटे महानुभाव यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी जे. बी. सराफ, जितूभाई बडेकर, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोषजी कांचन पाटील, दत्ताभाऊ कांचन पाटील यांच्यासह उरुळी कांचन पंचक्रोशीतील विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महंत श्री. गोपालव्यास कपाटे महानुभाव यांना जाहीर झालेल्या या पुरस्काराबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या कार्याला मिळालेली ही दाद समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.