पुणे : पुणे येथील केसनंद परिसरातील ऑफिसर्स करिअर अकादमी येथे ‘ भारत भारती ’ संस्थेच्या वतीने भव्य माजी सैनिक समागम व जनसभा उत्साहात पार पडली. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त (सार्धशताब्दी महोत्सव) तसेच पराक्रम दिनाच्या औचित्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमात भारत भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. विनयजी पत्राले यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. राष्ट्रनिर्माणात सैनिकांचे योगदान अतुलनीय असून समाजाने त्यांच्या त्यागातून प्रेरणा घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
विशेष अतिथी म्हणून एनएसजी कमांडर कर्नल तुषार जोशी (सेना मेडल) उपस्थित होते. अक्षरधाम मंदिरावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील थरारक अनुभव सांगताना त्यांनी त्या मोहिमेचे नेतृत्व करताना आलेल्या आव्हानांची माहिती दिली. राष्ट्रप्रेम, कुटुंबबोध, सामाजिक दायित्व व शिस्तबद्ध नागरिक जीवन यावर त्यांनी भर दिला.

या प्रसंगी भारत भारतीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, प्रदेश सचिव धर्मेंद्र सिंह यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. तसेच ऑफिसर्स करिअर अकादमीचे प्रा. अमित दुबे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात सक्रिय सहभाग नोंदविला.
समागमात भारत भारती संस्थेच्या राष्ट्रहितकारी ‘पंच-संकल्पां’*वर विचारमंथन करण्यात आले. यात स्वबोध, सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संरक्षण व नागरिक शिष्टाचार या मुद्द्यांचा समावेश होता.
गेल्या १६ वर्षांपासून पुण्यात कार्यरत असलेली भारत भारती संस्था महाराष्ट्रासह गुजरात, आसाम, बिहार व उत्तर प्रदेशात राष्ट्रीय एकात्मता व सांस्कृतिक जागृतीसाठी कार्यरत आहे.
कार्यक्रमाचा समारोप सामूहिक सहभोजनानंतर “वंदे मातरम्” व राष्ट्रगीताच्या जयघोषात करण्यात आला.