पुणे : पुण्याच्या ऐतिहासिक वारशाचे प्रतीक असलेल्या एम्प्रेस गार्डनमध्ये यंदाही भव्य पुष्पप्रदर्श नाचे आयोजन करण्यात आले असून, शहराच्या मध्यवर्ती भागात असा हिरवागार परिसर असणे पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. निसर्गसंवर्धन ही केवळ सरकारचीच नव्हे, तर समाजातील प्रत्येक घटकाची सामूहिक जबाबदारी असून, पुणे पोलिस ही जबाबदारी पूर्ण निष्ठेने पार पाडतील, असे प्रतिपादन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले.
एम्प्रेस गार्डन पुष्पप्रदर्शन २०२६ चे उद्घाटन गुरुवारी (ता. २२) पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ पद्मभूषण डॉ. माधव गाडगीळ यांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी बोलताना कुमार म्हणाले, “आज हरित सेनेची नितांत गरज असून ‘खाकीसेना’ आता ‘हरितसेनेच्या’ रूपात कार्य करणार आहे. शहरातील ४४ पोलिस ठाणे ‘ग्रीन पोलिस स्टेशन’ म्हणून विकसित करण्यात येणार असून, या उपक्रमात प्रत्येक पोलिस अधिकारी व कर्मचारी सक्रिय सहभाग घेईल.”
या प्रसंगी अनुपमा बर्बे (जॉइंट सेक्रेटरी), सुमन किर्लोस्कर (अध्यक्ष, प्रदर्शनी समिती), सुरेश पिंगळे (उपाध्यक्ष, प्रदर्शनी समिती) यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यंदा एम्प्रेस गार्डनमधील पुष्पप्रदर्शन हे अनोख्या व कलात्मक सादरीकरणामुळे नागरिकांच्या विशेष आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. जपानी पद्धतीतील इकेबाना पुष्परचना, विविध प्रकारचे बोन्साय वृक्ष यांमधून निसर्गाच्या सूक्ष्म सौंदर्याचे दर्शन घडत आहे.
या प्रदर्शनात पुण्यासह कोल्हापूर, सांगली, नाशिक तसेच इतर राज्यांतील नामांकित नर्सरी व्यावसायिकांनी सहभाग घेतला असून, दुर्मिळ व आकर्षक वनस्पतींनी बागकामप्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहे.
बागकामप्रेमींसाठी गुलाब पुष्प सजावट स्पर्धा, फळ-भाजी स्पर्धा, आकर्षक कुंड्यांच्या स्पर्धा तसेच गुलाब पुष्प स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हे पुष्पप्रदर्शन २३ ते २७ जानेवारी या कालावधीत सुरू राहणार असून, अधिकाधिक नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.