पुणे : कासुर्डी (ता. दौंड) येथील दीपगृह सोसायटी अनाथाश्रम बालनगरी येथे कौशल्याबाई वसंत मेमाणे यांच्या स्मृतिदिनानिमित्त ब्लँकेट व खाऊ वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला. हिवाळ्यातील कडाक्याच्या थंडीत अनाथ आणि गरजू मुलांना दिलासा मिळावा, या उद्देशाने शोभा टेमगिरे व सुनील टेमगिरे यांनी हा सामाजिक उपक्रम हाती घेतला. मुलांच्या शैक्षणिक गरजांचा विचार करून शाळेसाठी आवश्यक साहित्याचाही या वेळी वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे कौतुक करताना पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष तात्यासाहेब ताम्हाने म्हणाले, “अशा उपक्रमांमुळे समाजातील संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकी अधिक बळकट होते.”
उपक्रमाला मान्यवरांनी मोठ्या उत्साहाने हजेरी लावली. यामध्ये दौंड पंचायत समितीचे माजी सभापती दौलत (अण्णा) ठोंबरे, माजी सभापती नागनाथ हाके, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष तात्यासाहेब ताम्हाने, राष्ट्रवादी काँग्रेस दौंड तालुका उपाध्यक्ष उत्तम टेमगिरे, ‘केसरी’चे पत्रकार अमोल भोसले, तसेच शोभा टेमगिरे, सुनील टेमगिरे, साहिल टेमगिरे, ऋतुजा टेमगिरे, गजराबाई टेमगिरे, शाळेच्या विश्वस्त आश्लेशा ओनावळे, राजेश निंबाळकर, संतोष गायकवाड, सुवर्णा तेरेखोलकर आदींचा समावेश होता. विद्यार्थीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समाजातील गरजू मुलांसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, भविष्यातही असे सामाजिक कार्यक्रम सातत्याने राबविण्याची इच्छा शोभा टेमगिरे व सुनील टेमगिरे यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील तुपे यांनी केले, तर आभार अमोल भोसले यांनी मानले.
