पुणे : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील महात्मा गांधी सर्वोदय संघ संचलित पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात आणि गौरवपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी बोऱ्हाडे उपस्थित होते. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व लाभले.
भारतीय संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांचा उल्लेख करताना प्राचार्य डॉ. बोऱ्हाडे म्हणाले की, भारतीय संविधान लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष राष्ट्राच्या उभारणीची भक्कम पायाभरणी करते, तसेच देशाच्या प्रशासनाची चौकटही स्पष्ट करते.
यावेळी कार्यक्रम अधिकारी प्रा. भाऊसाहेब तोरवे व प्रा. प्रणिता फडके यांनी विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व आणि नागरिक म्हणून पार पाडावयाच्या कर्तव्यांची माहिती दिली. कार्यक्रमाला वाणिज्य विभाग प्रमुख सुजाता गायकवाड, संगणक विभाग प्रमुख प्रा. प्रतिक आढाव, प्रा. अनुजा शिंदे, प्रा. ऐवळे, कार्यालय अधीक्षक प्रदीप राजपूत आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात संविधान निर्मात्यांना अभिवादनाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी संविधानाची प्रस्तावना एकत्रितरीत्या वाचून लोकशाही मूल्यांप्रती निष्ठा व्यक्त केली. प्रस्तावना वाचनाचे नेतृत्व प्रा. प्रणिता फडके यांनी केले.
राष्ट्रीय सेवा योजना विभाग आयोजित संविधान दिन उत्सवामुळे विद्यार्थ्यांमध्ये संविधानिक मूल्यांची जाणीव दृढ झाली. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
