पुणे : नायगाव (ता. हवेली) येथील नायगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्ष पदासाठी झालेल्या निवड प्रक्रियेत सचिन हगवणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. सोसायटीच्या व्यवस्थापनात महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या या पदासाठी सर्व तेरा संचालक सदस्यांनी एकमताने हगवणे यांच्यावर विश्वास व्यक्त करत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
निवडीनंतर सचिन हगवणे यांनी संचालक मंडळाचे आभार मानत, “सोसायटीचा सर्वांगीण विकास साधण्यावर आणि सदस्यांच्या कल्याणाला प्राधान्य देण्यावर भर राहील. पारदर्शक, लोकाभिमुख व कार्यक्षम कारभार करण्याचा माझा प्रयत्न असेल,” अशी प्रतिक्रिया दिली.
हगवणे यांची बिनविरोध निवड होताच सोसायटीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी काळात कार्यक्षमता वाढविण्यासह विविध विकास उपक्रमांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
