पुणे : लोणी काळभोर शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक हृदयस्पर्शी आणि कौतुकास्पद घटना घडली. छत्रपती संभाजीनगरमधील अंदाजे तीन वर्षांचा चिमुकला आपल्या आई-वडिलांसोबत राहात असलेल्या इमारतीतून खेळता-खेळता बाहेर पडला. घरापासून दूर गेल्याने तो घाबरून दिशाहीन झाला आणि फिरत-फिरत लोणी स्टेशन चौकात पोहोचला.
चौकातील नागरिकांच्या नजरेस हा चिमुकला एकटाच फिरताना दिसताच त्यांनी त्याला सुरक्षित स्थळी घेत पत्रकार राम भंडारी यांच्या स्वाधीन केले. परिस्थितीची गंभीरता ओळखत भंडारी यांनी क्षणाचाही विलंब न लावता ११२ हेल्पलाईनवर कॉल करून मदत मागितली.
कॉल मिळताच लोणी काळभोर मार्शल पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पथकाने मुलाची सुरक्षितता सुनिश्चित करत त्याच्या पालकांचा शोध सुरू केला. काही वेळाच्या शोधानंतर मुलाचे पालक मिळाले आणि पोलिसांनी चिमुकल्याला सुखरूप त्यांच्या स्वाधीन केले. या संपूर्ण मदतीत गुन्हे शाखा युनिट ६ चे प्रसाद ताम्हाणे, निखिल मेमाणे आणि इंद्रजीत डाडर यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले.
पोलिसांच्या वेगवान आणि जबाबदार प्रतिसादामुळे एका कुटुंबाचा मोठा श्वास सुटला. स्थानिक नागरिकांनी पोलिस दलासह मदत करणाऱ्या सर्वांचे मनापासून कौतुक केले आहे. हा प्रसंग पुन्हा एकदा अधोरेखित करतो की नागरिक आणि पोलिस प्रशासन एकत्र आले तर समाजातील सुरक्षिततेची भिंत अधिक भक्कम होते.
