पुणे : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवारी (ता. २८) विविध ठिकाणी अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. काँग्रेस भवन आणि समता भूमी येथे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर महात्मा फुले वाडा येथील पुतळ्यासही काँग्रेस कमिटीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
काँग्रेस भवन येथील कार्यक्रमात बोलताना शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, “समतेचे कैवारी महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाची सुरूवात घरातूनच करत समाजात क्रांतिकारी बदल घडवून आणला. त्यांच्या प्रयत्नांमुळे महिलांसाठी शिक्षणाची दारे उघडली आणि आज सर्वच क्षेत्रात महिला समर्थपणे कार्य करत आहेत.” काँग्रेस पक्षाने फुलेंच्या विचारांना पुढे नेल्याने मुलींसाठी शाळांचे जाळे वाढले आणि महिलांना आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग मोकळा झाला, असे त्यांनी सांगितले.
महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाच्या स्थापनेद्वारे समाजातील अनिष्ठ रुढी व अन्यायकारक परंपरांविरुद्ध लढा उभारला. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढणे, पहिली सामूहिक शिवजयंती साजरी करणे आणि शिवाजी महाराजांचा पहिला पोवाडा लिहिण्याचा मानही त्यांनाच जातो, याची आठवण अरविंद शिंदे यांनी करून दिली. “महात्मा फुलेंचे विचार आजही समाजपरिवर्तनासाठी मार्गदर्शक ठरतात. त्यांना खरे अभिवादन करायचे असेल तर त्यांचे कार्य आपल्या कृतीतून जपले पाहिजे,” असे शिंदे म्हणाले.
या कार्यक्रमावेळी माजी गृहराज्य मंत्री रमेश बागवे, माजी महापौर कमल व्यवहारे, वीरेंद्र किराड, अजित दरेकर, अविनाश बागवे, प्राची दुधाने, रेखा अगरवाल, सिमा सावंत, इंदिरा बागवे, उषा राजगुरू, अनिता धिमधिमे, ॲड. राजश्री अडसूळ, ज्योती परदेशी, सुरेखा खंडागळे, संजय आगरवाल, अक्षय माने, हेमंत राजभोज, सचिन भोसले, फिरोज शेख, दिलीप लोळगे, सुरेश नांगरे, राजू कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
