पुणे : लोणी काळभोर परिसरातील जिल्हा परिषद शाळांच्या ६०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक उपयोगाच्या ३९ वस्तूंच्या किटचे वाटप रोटरी क्लब ऑफ पुणे कॅन्टोमेंट आणि ‘स्लीपिंग चिल्ड्रन अराऊंड द वर्ल्ड’ (SCAW – कॅनडा) या स्वयंसेवी संस्थेमार्फत करण्यात आले. गादी, स्पोर्ट्स कपडे, टॉवेल आदी शैक्षणिक व वैयक्तिक वापरातील आवश्यक साहित्य असलेल्या प्रत्येकी सहा हजार रुपये किंमतीच्या किटमुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचालीत मोठी मदत होणार आहे.
सिद्राम मळा येथील जिल्हा परिषद शाळेत झालेल्या या वितरण कार्यक्रमास SCAW कॅनडाच्या प्रमुख ज्युली गिप्सन, रोटरी क्लब ऑफ पुणे कॅन्टोमेंटच्या अध्यक्षा हेमा पांडे, प्रशांत काळभोर (संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे), विठ्ठल रामचंद्र काळभोर (चेअरमन, वी.वी. सेवा सह. सोसायटी), राजेंद्र काळभोर (उपसरपंच, लोणी काळभोर), सरपंच नागेश अंकुशराव काळभोर, ग्रामपंचायत सदस्य राहुल काळभोर तसेच सचिन आण्णा काळभोर, सचिन काळभोर, राजेश काळभोर, अमोल कोळपे (संचालक, वी.वी. सेवा सह. सोसा.), सचिन काळभोर, नेता केसकर, राजाभाऊ पिंगळे, मोहन पुजारी (अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ पुणे नॉर्थ), अश्विनी शिलेदार (अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवन) आणि आशुतोष वैद्य (अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ पुणे सारसबाग) यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना सरपंच नागेश काळभोर म्हणाले, “लोणी काळभोर येथील सर्व जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे हे ग्रामपंचायतीचे प्राधान्य आहे. पुढील काळात मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणखी उपक्रम राबवले जातील.”
मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि पालकांनी संस्थांच्या या उदार उपक्रमाचे कौतुक केले. किट मिळाल्याने विद्यार्थी आनंदित झाले असून शिक्षणासाठी आवश्यक साहित्य सहज उपलब्ध झाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.
