पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या निसर्गरम्य परिसरात रविवारी (ता. ३०) सकाळी भक्ती, उत्साह आणि एकात्मतेची अनोखी लहर उमटली. भगवंत श्री सत्य साई बाबा यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त श्री सत्य साई सेवा संस्था, महाराष्ट्र (पश्चिम) तर्फे आयोजित ‘श्री सत्य साई रन अँड राईड’ या भव्य उपक्रमात पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत फिटनेस आणि सामाजिक ऐक्याचा संदेश अधोरेखित केला. फिट इंडिया अभियानातून युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने या उपक्रमाला राष्ट्रीय पातळीवरील समर्थन दिले.
पुणे आवृत्तीतील ३ किमी, ५ किमी आणि १० किमी धावणे व सायकलिंग अशा विविध श्रेणींमध्ये तब्बल ५,००० पेक्षा अधिक नागरिकांनी उत्साहाने भाग घेतला. विद्यापीठ परिसरात या निमित्ताने सौहार्द, सकारात्मक ऊर्जा आणि सामूहिक आरोग्याची भावना दाटून आली होती.
सरकारी, औद्योगिक, क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शान वाढवली. यामध्ये जेटलाइन ग्रुपचे चेअरमन राजन नवानी, श्री सत्य साई सेवा संस्था महाराष्ट्र पश्चिमचे स्टेट प्रेसिडेंट धर्मेश वैद्य, जिल्हाध्यक्ष कॅ. गिरीश लेले, एसपीपीयूचे प्रा. पराग काळकर, रवींद्र शिंगापुरकर, प्रा. डी. बी. पवार, प्रा. ज्योती भाकरे, क्रीडापटू सुचेता कडेठाणकर, लाइटहाऊस कम्युनिटीजचे रिची माथुर आदींचा समावेश होता.
धर्मेश वैद्य म्हणाले, “हा उपक्रम फक्त रन किंवा राईड नाही; तो निःस्वार्थ प्रेम, एकात्मता आणि सेवेमधील मूल्यांना कृतीतून जोडणारा सेतू आहे.”
प्रा. पराग काळकर यांनी फिट इंडिया मिशनशी याची सांगड अधोरेखित करत, युवकांच्या सक्षमीकरणासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व मांडले.
राजन नवानी म्हणाले, “विश्वास आणि फिटनेस यांचा सुंदर मिलाफ म्हणजे हा कार्यक्रम. विविधतेत एकतेचे मूल्य त्यातून अधोरेखित होते.”
कार्यक्रमाचा समारोप सर्व सहभागींच्या आरोग्य, शांतता आणि सामाजिक सौहार्द जपण्याच्या शपथग्रहणाने झाला. जन्मशताब्दी वर्षानिमित्त संस्था महाराष्ट्रभर तसेच देशभरातील २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांमध्ये ‘श्री सत्य साई प्रेम प्रवाहिनी’ रथयात्रेद्वारे एकता आणि प्रेमाचा संदेश पोहोचवत आहे. तसेच ‘श्री सत्य साई नॅशनल क्रिकेट लीग’द्वारे युवकांमध्ये टीमवर्क, शिस्त व सेवाभावाची जपणूक केली जात आहे.
