पुणे : महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाशी नाते दृढ करून शिवछत्रपतींची पराक्रमगाथा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हे या स्पर्धेचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे मत महाराष्ट्र साहित्य परिषद शाखेचे अध्यक्ष अनिरुद्ध पवार यांनी व्यक्त केले. संघर्ष प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, उरुळी कांचन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई ‘गड-किल्ले बांधणी स्पर्धा’ आणि बक्षीस वितरण समारंभ नुकताच उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पांजली अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले. यानंतर विविध वयोगटातील साठहून अधिक स्पर्धकांनी साकारलेल्या किल्ल्यांची माहिती सादर करण्यात आली. महाराष्ट्राच्या गड-किल्ल्यांविषयी जनजागृती प्रभावीपणे होत असल्याचे मत डॉ. राज दिवेकर यांनी मांडले. “किल्ला तयार करताना इतिहासात डोकावणे, त्यामागील शौर्य समजून घेणे आवश्यक आहे. हा उपक्रम मुलांपासून तरुणांपर्यंत सर्वांसाठी महत्त्वाचा आहे,” असे संघर्ष प्रतिष्ठानचे संदीप कांचन यांनी सांगितले.
समारंभास उरुळी कांचन पतसंस्थेचे संचालक शिवाजी कांचन, माजी उपसरपंच युवराज कांचन, संजय टिळेकर, नारायण कांचन, निखिल कांचन, इतिहास अभ्यासक खलिल शेख, तसेच सचिन कांचन, सुनील तुपे, सौरभ जगताप, निलेश कांचन, शारिक शेख आणि पत्रकार अमोल भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेत प्रथम क्रमांक किल्लेदार ओम लोखंडे मित्र मंडळाने पटकावला. तसेच केदार जाधव, शिव प्रतिष्ठान, शिवमुद्रा ग्रुप, रेहान शेख, आर्यन खलसे, कार्तिक शिंदे, साहिल खलसे, नितीन लोंढे आणि शिवांश इंगळे यांनीही उत्तम कामगिरी करत बक्षिसे मिळविली. गावकऱ्यांचा आणि चाहत्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असल्याने स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गड-किल्ला संस्कृती जपण्याचा हा उपक्रम दरवर्षी अधिक व्यापक होत असून यंदाही मुलांकडून आणि पालकांकडून मोठा प्रतिसाद मिळाल्याचे आयोजकांनी सांगितले.
प्रास्ताविक अनिरुद्ध पवार यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज माने यांनी केले, तर आभार प्रदर्शन सारीक सय्यद यांनी मानले.
