पुणे, दि. १ डिसेंबर २०२५ : विश्वकल्याणाच्या संकल्पनेला आकार देणारे श्रीराममंदिर भव्यतेने उभे राहिले असून आता त्याहून अधिक सामर्थ्यवान, सुंदर ‘राष्ट्रमंदिर’ उभे करण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात, आदित्य प्रतिष्ठान आयोजित संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी कांची कामकोटी पीठाचे जगद्गुरू शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती स्वामी, आदित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष शंकर अभ्यंकर व अपर्णा अभ्यंकर उपस्थित होते.
संघ हा समाजातीलच लोकांनी उभारलेला असून उपकार किंवा अहंकाराची भावना संघात कधीच नसल्याचे डॉ. भागवत म्हणाले. “समाज संघटित झाला तरच राष्ट्र वैभवसंपन्न होईल आणि राष्ट्र बलसंपन्न झाले तरच विश्वात सुख-शांती प्रस्थापित होईल. देश उभा राहण्यासाठी समाज उभा राहणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले. कठीण प्रसंगात समाजाने दिलेल्या साथीतूनच संघाची वाढ झाली, याची जाणीव त्यांनी व्यक्त केली.
शंकर अभ्यंकर यांनी जगातील अनेक संस्कृती आक्रमणांमुळे नष्ट झाल्याचे सांगत, भारतीय हिंदू संस्कृतीने विश्वाला कुटुंब मानण्याची भूमिका जपल्यानेच ती टिकून असल्याचे मत व्यक्त केले. ब्रिटिशांनी भारताचा ‘स्व’ मोडण्याचा प्रयत्न केला, असेही ते म्हणाले. भारताची सनातन संस्कृती ही मानवतेला मार्गदर्शक असल्याचे प्रतिपादन जगद्गुरू शंकराचार्यांनी केले. विविध भाषा, परंपरा असतानाही भारतात लोकशाही यशस्वी झाल्याचे ते म्हणाले. “लोकशाही अधिक बळकट व्हावी यासाठी चांगल्या लोकांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे,” असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात वैश्विक संत भारती महाविष्णू मंदिराच्या कोनशिलेचे अनावरण, ‘भारतीय उपासना’ विश्वकोषाच्या तिसऱ्या आवृत्तीचे तसेच जितेंद्र अभ्यंकर यांच्या ‘पंढरीश’ या ध्वनिफितीचे प्रकाशन करण्यात आले. रामायणावर आधारित ‘निरंतर’ या संगीत नाटिकेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. डॉ. आदित्य अभ्यंकर यांनी सूत्रसंचालन केले, तर जितेंद्र अभ्यंकर यांनी वंदे मातरम सादर केले.
प्रतिकूल परिस्थितीत अविरत कार्य करत डॉ. हेडगेवार, प्रचारक, दुर्गम भागातील कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांनी प्राणांची आहुती देत संघाचा वटवृक्ष वाढवला, याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतानाच संघशक्तीतून समाजाला कधीही उपद्रव होणार नाही, असे डॉ. भागवत यांनी सांगितले.
