राजेवाडी : “मनुष्याच्या अंतःकरणात दया असेल तर धर्म जागृत होतो. खरे सुख हे धर्माच्याच ठिकाणी असते. सत्ययुगापासून कलियुगापर्यंत धर्माचे प्राबल्य कायम आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक व प्रवचनकार डॉ. रवींद्र भोळे यांनी केले.
श्री दत्तात्रय (दादा महाराज) जगताप यांच्या कृपाशिर्वादाने औदुंबर भक्त मंडळ, चिदानंद भक्त परिवार नाशिक, सद्गुरू श्री शंकर महाराज भक्त परिवार चाकण तसेच समस्त ग्रामस्थ राजेवाडी यांच्या वतीने श्री स्वामी समर्थ दत्त मठ, राजेवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. भोळे बोलत होते.
कार्यक्रमादरम्यान दिल्ली येथे प्राप्त झालेल्या ‘हिंदू रत्न’ पुरस्काराबद्दल डॉ. रवींद्र भोळे यांचा दादा महाराज जगताप यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी डॉ. भोळे यांचे प्रवचनही आयोजित करण्यात आले होते.
ह.भ.प. बापूसो महाराज गायकवाड (वाघापूर) यांनी डॉ. भोळे यांचा परिचय करून देताना, “उरुळी कांचन येथे ते अत्यल्प दरात वैद्यकीय सेवा देतात. सामाजिक, धार्मिक, वैद्यकीय, अध्यात्मिक तसेच नैसर्गिक आपत्तींमध्ये त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. पुरंदर पूर्व भागात त्यांचे वैद्यकीय योगदान महत्त्वाचे असून त्यांना भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार मिळावा,” अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते शंकर झरड पाटील, व्यासपीठ चालक ह.भ.प. बापूसो महाराज गायकवाड व पत्रकार-सामाजिक कार्यकर्ते सदाशिव कांबळे यांचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला पंचक्रोशीतील अनेक भाविक, ग्रामस्थ आणि भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
