पुणे: बारामती शहरात नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या आचारसंहितेदरम्यान बेकायदेशीर शस्त्र बाळगून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाला बारामती शहर पोलिसांनी अटक केली. संशयिताकडून गावठी पिस्तूल, चार जिवंत काडतूस आणि एक मॅगझिन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, ही कारवाई बारामती शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली.

गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक सतीश राऊत, पोलीस अंमलदार अमीर शेख, दत्तात्रय मदने आणि पथक २८ नोव्हेंबर २०२५ रोजी अमराई भागात गस्त घालत असताना त्यांना जनहित प्रतिष्ठान शाळेजवळ एक इसम बेकायदेशीर शस्त्रासह फिरत असल्याची माहिती मिळाली. राऊत यांनी तातडीने प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांना माहिती देत सापळा रचला. काही वेळातच संशयिताला ताब्यात घेण्यात आले.

पंचासमक्ष घेतलेल्या अंगझडतीत आरोपीकडे गावठी पिस्तूल आणि काडतूस मिळून आले. त्याची ओळख प्रदीप सुरेश नकाते (वय २७, रा. ऋतुसृष्टी अपार्टमेंट, प्रगतीनगर, बारामती) अशी झाली. या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात आर्म्स अॅक्टनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

माननीय न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली असून, प्राथमिक चौकशीत त्याने शस्त्र कोठून मिळवले याबाबत काही माहिती दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. शस्त्र पुरवठादाराचा शोध घेण्यासाठी तपास पथक सक्रिय असून लवकरच त्याला ताब्यात घेतले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

अटक आरोपीने शस्त्र कोणत्या उद्देशाने जवळ बाळगले होते याची सखोल चौकशी सुरू असून, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, गणेश बिरादार आणि उपविभागीय अधिकारी सुदर्शन राठोड तपासावर लक्ष ठेवून आहेत.

“बारामतीमध्ये बेकायदा शस्त्रे चालणार नाहीत. अशा प्रकारांची माहिती तातडीने पोलिसांना द्यावी; माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल,” असा इशारा प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *