पुणे: बारामती शहरातील ज्येष्ठ नागरिकांना पर्यटनाचे आमिष दाखवून त्यांच्या मेहनतीची बचत लाटणारा फरार आरोपी दोन वर्षांच्या सततच्या शोध मोहीमेनंतर अखेर बारामती शहर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. आदम मेहबूब सय्यद (रा. पवारवाडी, ता. फलटण, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २०२३ मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी “सिक्कीम – दार्जिलिंग पर्यटन टूर आयोजित करून देतो” असे आमिष दाखवत सय्यद याने वेळोवेळी २ लाख १० हजार रुपये घेतले व त्यांचा अपहार केला. याप्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात भा.दं.सं. अन्वये गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी सतत ठिकाणे बदलत होता. पोलिसांना दिशाभूल करून तो तब्बल दोन वर्षे फरार राहिला.
आरोपीचा शोध लावण्यासाठी पोलिस हवालदार रामचंद्र शिंदे, हवालदार सुलतान डांगे, पोलीस शिपाई पोपट कवीतके व गिरीष नेवसे यांनी तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती व सातत्यपूर्ण पाठपुराव्याच्या आधारे त्याच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले. अखेर १ डिसेंबर २०२५ रोजी आरोपी आपल्या राहत्या घरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पथकाने पवारवाडी येथे सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
सध्या या गुन्ह्याचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक संध्याराणी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. आरोपीने इतर कुणाचीही फसवणूक केली आहे का, याचा सखोल तपास पोलिसांकडून केला जात आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, गणेश बिरादार, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड व प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
ज्येष्ठ नागरिकांनी पर्यटन, गुंतवणूक, लॉटरी किंवा आर्थिक आमिषांबाबत कोणतीही शंका आल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.
