पुणे : कोरेगावमूळ (ता. हवेली) येथील श्रीकृष्ण मंदिराचा लोकार्पण सोहळा, श्रीकृष्ण मूर्ती प्रतिष्ठापना, कलशारोहण, संत-महंत भक्त समागम व पंचावतार उपहार महोत्सव रविवार दि. ७ डिसेंबर आणि सोमवार दि. ८ डिसेंबर २०२5 रोजी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या धार्मिक सोहळ्याची माहिती मंदिर संस्थापक व श्रीकृष्ण आध्यात्मिक प्रतिष्ठाणचे मुख्य विश्वस्त महंत विद्याधरदादा शहापूरकर यांनी दिली.
रविवार दि. ७ डिसेंबर रोजी सकाळी ५ वाजता श्रीमूर्ती अभिषेकाने कार्यक्रमांची सुरुवात होईल. सकाळी ७ वाजता श्रीमद्भगवद्गीता पठण, दुपारी १२ वाजता पंचावतार उपहार, आरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ३ वाजता उरुळी कांचन येथील श्रीकृष्ण मंदिरापासून कोरेगावमूळ मंदिरापर्यंत शोभायात्रा काढण्यात येणार आहे. सायंकाळी ७ वाजता कीर्तनकेसरी महंत अचलपूरकरबाबा यांचे प्रवचन होईल, तर रात्री ९ वाजता महाप्रसादाचे वितरण होईल.
सोमवार दि. ८ डिसेंबर रोजी सकाळी ५ वाजता श्री दत्तात्रेय प्रभूंचे मंगलस्नान होईल. सकाळी ७ वाजता स्तुति–स्तोत्र पठण, ९ वाजता ध्वजारोहण, तर ९.३० वाजता कलशारोहण व मूर्ती स्थापना पार पडेल. सकाळी १० वाजता ईशस्तवन, स्वागत, स्वागतगीत, प्रास्ताविक, दीपप्रज्वलन, धर्मप्रबोधन सभा व आभारप्रदर्शन असा कार्यक्रम होईल. दुपारी १२ वाजता उपहार, आरती व महाप्रसादाने सोहळ्याची सांगता होईल.
या दोन दिवसीय महोत्सवाला स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधी, आजी-माजी पदाधिकारी, पुणे जिल्ह्यातील विविध मठ, मंदिर, आश्रमातील संत, महंत, आचार्यगण, तसेच मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार असल्याची माहिती श्रीकृष्ण आध्यात्मिक प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल कोलते यांनी दिली.
कार्यक्रमावेळी मंदिर व्यवस्थापक अनिलबाबा महानुभाव, उपाध्यक्ष सुनील खेडेकर, एस. आर. गोयल, सचिव सुदर्शन कानकाटे, खजिनदार संजय भोसले, विश्वस्त दत्तात्रय सावंत, उमेश सरडे, बाबासो चौधरी, निवृत्ती वायकर, हरिभाऊ बोधे, संपत भोरडे, तुकाराम ताठे, तुकाराम शितोळे आदी मान्यवर उपस्थित होते.
