पुणे : पूर्व हवेलीतील टिळेकरवाडी येथील श्रीदत्तात्रयप्रभू मंदिरात श्रीदत्तजन्मोत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. पहाटे श्रीमुर्तीचे मंगलस्नान, अभिषेक, श्रीदत्तजन्मोत्सव विधी, महाआरती, श्रीदत्तात्रयप्रभूंचा पाळणा, पारायण अशा धार्मिक कार्यक्रमांनी परिसर भारावून गेला.
संध्याकाळी महंत श्री. गोपालव्यास कपाटे यांच्या सुश्राव्य प्रवचनाने उपस्थित भाविकांना अनोख्या आध्यात्मिक अनुभूतीचा लाभ झाला. ब्रह्मविद्या शास्त्रातील सिद्धांत, दृष्टांतांच्या आधारे त्यांनी कर्म, अकर्म आणि विकर्म यांवरील सखोल विवेचन करत भाविकांना मार्गदर्शन केले. त्यांच्या स्पष्टोक्तीने श्रोते मंत्रमुग्ध झाले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्रीदत्त सेवा ट्रस्टचे पदाधिकारी, ग्रामस्थ तसेच बाहेरगावाहून आलेले भक्त यांचे योगदान महत्त्वपूर्ण होते. विशेषत: टिळेकरवाडीतील तरुण वर्गाने मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून नियोजनात मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या उत्साहाचे महंत गोपालव्यास यांनी विशेष कौतुक केले.
मंदिराची आकर्षक सजावट आणि रोषणाईने वातावरण अधिकही भक्तिमय झाले होते. दिवसभर चाललेल्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून श्रीदत्तजयंतीचा उत्सव साजरा केला.
