पुणे : उरुळी कांचन येथील पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयामार्फत जागतिक मृदा दिनानिमित्त ‘लॅब टू लँड’ उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत शिंदवणे व उरुळी कांचन परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील मातीचे नमुने संकलित करून त्यांचे प्रयोगशाळेत परीक्षण करण्यात आले. मातीचा पोत सुधारण्यासाठी तसेच त्यानुसार पिकांचे नियोजन करण्यासाठी महाविद्यालयातर्फे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेटून मार्गदर्शन केले जाणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ. शिवाजी बोऱ्हाडे यांनी दिली.
डॉ. बोऱ्हाडे म्हणाले, “गतवर्षीपासून ‘लॅब टू लँड’ हा उपक्रम महाविद्यालयामार्फत राबवला जात आहे. यावर्षी उरुळी कांचन, यवत, नायगाव पेठ, डाळिंब, शिंदवणे, सोरतापवाडी, ताम्हाणवाडी, भवरापूर, अष्टापूर तसेच पंचक्रोशीतील अन्य गावांमधील शेतातील मातीचे नमुने तपासणीसाठी गोळा करण्याचे काम हाती घेतले आहे.” या कार्यासाठी बायफ संस्थेचे सहकार्य घेतले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
माती परीक्षण प्रक्रियेत विज्ञान विभागातील प्रा. दीपाली चौधरी व प्रा. प्रतिक्षा कोद्रे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमावेळी उपप्राचार्य डॉ. अविनाश बोरकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. शुभांगी रानवडे, रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा. नंदिनी सोनवणे, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख प्रा. अनुजा झाटे, प्रा. स्वाती मासाळकर, प्रा. हर्षल भोसले, कार्यालयीन अधीक्षक प्रदीप राजपूत, विशालदीप महाडिक तसेच विज्ञान विभागातील विद्यार्थी उपस्थित होते.
