पुणे: केसनंद–वाडेबोल्हाई पंचायत समिती गणाचे उमेदवार कुशल (नाना) सातव यांच्या अष्टापूर दौऱ्याने रविवारी (ता. ८) अक्षरशः धडाकाच उडवला. गावात सातव यांच्या स्वागतासाठी घेतलेली मिरवणूक ढोल–ताशे, फटाक्यांची आतषबाजी आणि पारंपरिक बैलगाडी रॅली यामुळे भव्य उत्सवात बदलली. गावभर केवळ एकच चर्चा— “सातवांचा शक्तीप्रदर्शनाचा जल्लोष!”
अष्टापूर येथील भैरवनाथ मंदिर येथे झालेल्या सभेत ग्रामस्थ, स्थानिक नेते, आजी–माजी सरपंच, सदस्य यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून सभास्थळ खचाखच भरून टाकले. स्वागत सोहळ्याची पराकाष्ठा तेव्हा झाली, जेव्हा जेसीबीने प्रचंड पुष्पहार सातव यांना अर्पण करण्यात आला. महिलांनी औक्षण करून, फुलांच्या पायघड्या घालत पारंपरिक पण प्रभावी असा सत्कार केला.
यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना उमेदवार कुशल सातव म्हणाले, की पदासाठी कधी धावपळ केली नाही. लोकांचे सुख–दुःख हेच माझे कार्य. अर्ध्या रात्री हाक दिली तरी मी हजर राहीन; समाजापेक्षा मोठं काही नाही.”
दरम्यान, कुशल नाना सातव हेच आमचे पक्ष; ते कुठल्याही पक्षातून लढले तरी मत आमचे त्यांनाच!” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
अष्टापुरात उमटलेला हा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, सातव यांच्या प्रचाराला मिळालेली गती दौऱ्यात स्पष्टपणे जाणवत होती.
