पुणे: सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपाशिर्वादाने संत निरंकारी चेरिटेबल फाउंडेशनतर्फे रविवारी, ७ डिसेंबर २०२५ रोजी संत निरंकारी सत्संग भवन, आव्हाळवाडी (पुणे झोन) येथे भव्य रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले. आव्हाळवाडी सेक्टरअंतर्गत आव्हाळवाडी, मांजरी बु., लोणी काळभोर, उरुळी कांचन, केशवनगर, हिंगणगाव व वाडे बोल्हाई या शाखांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरास अनुयायी व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला. शिबिरात एकूण १९३ युनिट रक्तसंकलन झाले असून संत निरंकारी रक्तपेढी, विलेपार्ले यांनी १२४ तर ससून रक्तपेढीने ६९ युनिट रक्त संकलित केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन आदरणीय वासुदेव कुंभार (ज्ञानप्रचारक, पुणे) यांच्या हस्ते झाले. या वेळी मा. उपसरपंच संदेश आव्हाळे, ग्रामपंचायत सदस्य कोमल आव्हाळे, अमोल आव्हाळे, मा. उपसरपंच शरद आव्हाळे व विक्रम कुटे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी मिशनच्या समाजसेवेच्या वाटचालीचे कौतुक केले.
‘रक्त नाल्यांमध्ये नाही, नाड्यांमध्ये वाहिले पाहिजे’ हा बाबा हरदेव सिंहजी महाराज यांचा संदेश सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सेवा उपक्रमांतून सतत पुढे नेला जात आहे. परिसरात स्वच्छता, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी, नेत्र चिकित्सा व महिला सशक्तीकरण अशा उपक्रमांद्वारे मिशन समाजसेवेत मोलाचे योगदान देत आहे.
रक्तदान शिबिराच्या यशात सेवादल, स्वयंसेवक व अनुयायांचे विशेष श्रम लाभले. जनजागृतीसाठी घरोघरी संपर्क मोहिम राबविण्यात आली. सर्व रक्तदाते व मान्यवरांचे आभार सेक्टर प्रमुख दत्तात्रय सातव यांनी मानले. क्षेत्रीय संचालक अवनीत तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर यशस्वीरीत्या संपन्न झाले.
