पुणे : पुणे गुन्हे शाखेतील युनिट १ मधील दोन पोलिस शिपाई बेकायदेशीर मटका जुगार चालकांशी संबंध ठेवल्याच्या गंभीर आरोपांमुळे तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे. पोलिस उपायुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे यांनी हे निलंबनाचे आदेश जारी केल्याने पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. निलंबित पोलिस शिपाई यांची नावे शुभम जयवंत देसाई आणि अभिनव बापुराव लडकट अशी आहेत.
१७ नोव्हेंबर रोजी समर्थ पोलिसांनी औदुंबर अर्जुन सोनवणे (६५) याला मटका जुगार खेळल्याप्रकरणी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान सोनवणेने तो बाला उर्फ प्रवीण राजेंद्र चव्हाण याच्यासाठी काम करत असल्याचे सांगितले. यापूर्वी ११ नोव्हेंबर रोजी पोलिसांनी बाला चव्हाणला पोलिस उपयुक्त निखिल पिंगळे यांच्या समोर हजर केले होते.
तपासादरम्यान आरोपींच्या मोबाईल रेकॉर्डची पडताळणी करताना दोन्ही निलंबित पोलिस शिपाई आरोपी चव्हाणच्या संपर्कात असल्याचे समोर आले. विशेषतः, पोलिस शिपाई शुभम देसाई यांनी आरोपीला वारंवार फोन करून संशयास्पद संवाद साधल्याचे निष्पन्न झाले. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींपासून दूर राहण्याबाबत आधीच तोंडी इशारा देण्यात आला होता; मात्र त्यात सुधारणा न झाल्याचेही तपासात स्पष्ट झाले.
बेकायदेशीर कारवायांशी त्यांचा कथित संपर्क हा पोलिस दलाच्या प्रतिमा आणि अखंडतेसाठी घातक ठरत असल्याचे पाहता पोलिस उपयुक्त निखिल पिंगळे यांनी दोन्ही पोलिस शिपाईना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले.
