पुणे : मौजे कोलवडी, मांजरी खुर्द आणि आव्हाळवाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचे वारंवार दर्शन होत असून, काही ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यात जनावरेही मृत्युमुखी पडली आहेत. गायकवाड वस्ती, थोरातवस्ती, नामाजी पाटील मळा, वीटीपी प्रकल्प परिसर तसेच डोमखेलवस्ती या भागांमध्ये बिबट्यांच्या हालचाली वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही तिन्ही गावे शहरालगत असल्याने येथील लोकसंख्या सुमारे एक लाखांच्या घरात आहे. दाट लोकवस्तीच्या या परिसरात वन्यप्राण्यांची वाढती वावरामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.
याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी थेऊर ग्रामपंचायत सदस्य युवराज काकडे यांनी उप वनसंरक्षकांकडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. वन विभागाच्या पथकाने त्वरित कोलवडी, मांजरी खुर्द आणि आव्हाळवाडी परिसरात पाहणी करून नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
