पुणे: अष्टापूर (ता. हवेली) येथे आज सकाळी साडेसहाच्या सुमारास दशक्रिया विधीसाठी घरातून निघालेल्या महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. अष्टापूर खोलशेत वस्ती येथील ही महिला खानापूरकडे जाण्यासाठी घरातून सुरेश आनंदा कोतवाल यांच्या घराच्या दिशेने पायी जात असताना मध्यरस्त्यात अचानक बिबट्याने झडप घालत गंभीर जखमी केले.
हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेला तत्काळ स्थानिकांनी मदत करून वाघोली येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. काही दिवसांपासून बिबट्याचे हालचाली सुरू असून अखेर हल्ल्यापर्यंत परिस्थिती पोहोचल्याने ग्रामस्थ आक्रोशातून संताप व्यक्त करत आहेत. अष्टापूरच्या विद्यमान सरपंच पुष्पा सुरेश कोतवाल, उपसरपंच संजय भिकू कोतवाल, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक शामराव कोतवाल, माजी संचालक श्रीहरी कोतवाल, माजी सरपंच कविता जगताप, उपसरपंच सोमनाथ कोतवाल, तसेच दत्तात्रेय कटके, राजेश कोतवाल यांच्यासह सर्व ग्रामस्थांनी वनविभागाने तातडीने कार्यवाही करून या नरभक्षी बिबट्याला पकडावे, अशी ठाम मागणी केली आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, सकाळ-संध्याकाळच्या वेळी रस्त्यावर फिरणे कठीण झाले असून शाळा, कामधंद्यासाठी जाणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत. लवकरात लवकर पिंजरा लावून योग्य ती कारवाई केल्याशिवाय परिस्थिती नियंत्रणात येणार नाही, असे ग्रामस्थांनी सांगितले.

दरम्यान, वनविभागाकडून संबंधित पथकाला घटनास्थळी पाठवण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *