पुणे: मौजे थेऊर, कोलवडी-साष्टे, नायगाव आणि हिंगणगाव परिसरातील शेतकऱ्यांची अनेक दिवसांपासूनची महत्त्वाची मागणी थेऊर ग्रामपंचायत सदस्य युवराज काकडे यांच्या माध्यमातून अखेर मान्य झाली आहे. बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे रात्रीच्या वेळी शेतीपंपासाठी मिळणारा वीजपुरवठा शेतकऱ्यांसाठी धोकादायक ठरत होता. त्यामुळे दिवसा वीजपुरवठा सुरू करावा, अशी सातत्याने होत असलेली मागणी महावितरण विभागाने तातडीने विचारात घेतली आहे.
गेल्या १५ दिवसांपासून महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांशी सुरू असलेल्या पाठपुराव्यानंतर, बुधवारी (ता. १०) सकाळी रास्तापेठ येथील कार्यालयात मुळशी विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. बैकर यांची प्रतिनिधी म्हणून युवराज काकडे व त्यांच्या मंडळाने भेट घेतली. यावेळी दिवसा वीजपुरवठ्याबाबतचे सविस्तर निवेदन देऊन मागणीची तातडी अधोरेखित करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या मागणीची तत्काळ दखल घेत महावितरण विभागाकडून आवश्यक कार्यवाही करण्यात आली आणि गुरुवारपासून (ता. ११) दिवसा वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला प्रश्न सुटल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
