सुनील भोसले, प्रतिनिधी
पुणे: मराठी सिनेमा नेहमीच कुटुंबव्यवस्था, नातेसंबंध आणि संस्कृती यांना कलात्मक रूपात मांडत आला आहे. त्याच परंपरेतून “सावित्री कलयुगातली” हा नवा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. वटसावित्रीच्या पार्श्वभूमीवर आधारित हा चित्रपट सत्यवान-सावित्रीच्या नात्याची आजच्या काळातील सांगड घालत आधुनिक कुटुंबव्यवस्थेवर संदेश देतो.
अति लाड, चुकीचे संगोपन आणि त्यातून वाढणारे दुरावे—या सामाजिक प्रश्नांना स्पर्श करत दिग्दर्शक प्यारेलाल शर्मा यांनी मांडलेली ही कहाणी स्त्री-पुरुषांच्या नात्यातील विश्वास, त्याग आणि संकटसमयी सोबत उभे राहण्याच्या नात्यांवर प्रकाश टाकते. मुलावर संकट आलं, तर आई-वडिलांची माया कशी खंबीरपणे पाठीशी उभी राहते, हेही चित्रपटातून दाखवले गेले आहे.
जय मल्हार एंटरटेनमेंट वर्ल्ड व एसपी एंटरटेनमेंट वर्ल्ड प्रस्तुत हा पहिला चित्रपट असून निर्माता खानदेश सुपुत्र, कराटे मास्टर नानासाहेब बच्छाव (निजामपूर, धुळे) यांनी निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे. सहनिर्मिती धनश्री बच्छाव व रवी कुमार यांची आहे. चित्रपटाच्या प्रमुख भूमिका पवन चौरे आणि महेक शेख यांनी साकारल्या आहेत, तर अभिनेत्री श्वेता भामरे महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. नकारात्मक भूमिकेत जयराज नायर आणि खलनायकाच्या भूमिकेत नानासाहेब बच्छाव दिसणार आहेत. संवाद लेखन सुजाता पवार व राकेश शिर्के यांचे आहे.
ट्रेलर-पोस्टरचे लोकार्पण राज्य मंत्रिमंडळातील आदरणीय गणेशजी नाईक यांच्या हस्ते झाले असून त्यांनी चित्रपटास मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. “या चित्रपटातून आयुष्यात शिकण्यासारखे खूप काही आहे,” असे अभिनेत्री श्वेता भामरे यांनी सांगितले.
“सावित्री कलयुगातली” हा चित्रपट २६ डिसेंबर २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत असून मनाला भिडणारी कथा आणि लक्षवेधी गाणी अनुभवण्यासाठी चित्रपटगृहात जाण्याचे आवाहन निर्मात्यांनी केले आहे.
