पुणे : रांजणगाव एमआयडीसी परिसरात दरोड्याच्या तयारीसाठी आलेल्या सहा जणांना पोलिसांनी कौशल्यपूर्ण कारवाई करत पकडले. रविवार, ९ डिसेंबर २०२५ रोजी रात्री सुमारे ११ वाजता ही कारवाई करण्यात आली.

डायल ११२ वर आलेल्या कॉलमधून एका बंद पडलेल्या कंपनीत काही संशयित व्यक्ती दांडे व टिकावासह दिसल्याची माहिती सुरक्षा रक्षकांनी दिली. ही माहिती मिळताच पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी तपास पथकाला तात्काळ घटनास्थळी रवाना केले.

पथकातील अविनाश थोरात, दत्तात्रय शिंदे, विलास आंबेकर आणि उमेश कुतवळ यांनी घटनास्थळी पाहणी केली. तपासादरम्यान गुजरात पासिंग असलेली एक संशयित गाडी कंपनीजवळ दिसल्याचे समोर आले. सुरक्षा रक्षकांना पाहताच ही गाडी पळून गेल्याचेही उघड झाले. पोलिसांनी शोधमोहीम राबवत खंडाळामाथा येथे महामार्गालगत असलेल्या हॉटेलसमोर तीच कार शोधून काढली. पोलिस पाहताच कारमधील इसम पळण्याचा प्रयत्न करत असतानाच त्यांना ताब्यात घेण्यात आले.

ताब्यात घेतलेल्यांमध्ये —
सुरेशभाई प्रभुभाई धामेचा, जितेंद्र दिनेश डाभी, मेहल सुरेशभाई धामेचा, भरतभाई देवजीभाई सोलंकी, उत्सव जितेंद्रभाई डाभी, भरतभाई जिवराजभाई कोळी (सर्व रा. मोरबी, गुजरात) — यांचा समावेश आहे.

तपासात आरोपींकडे असलेल्या मोबाईलमध्ये बंद पडलेल्या कंपनीचे फोटो सापडले, तर कारमधून दरोड्यासाठी वापरायची साधने — टिकाव, लोखंडी टोकदार चाकू, इतर साहित्य आणि सहा मोबाईल — असा एकूण सुमारे ३ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौकशीमध्ये आरोपींनी कंपनीतील स्क्रॅप किंवा मातीमधून मौल्यवान धातू मिळण्याच्या संशयावरून चोरीसाठी आल्याची कबुली दिल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी दरोडा व चोरीच्या तयारीचा गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना १२ डिसेंबर २०२५ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याने केली असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अविनाश थोरात करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *