पुणे: खुटबाव (ता. दौंड) येथे दि. १० डिसेंबर २०२५ रोजी यशवंतराव चव्हाण कला व क्रीडा स्पर्धा अंतर्गत दौंड तालुक्यातील केडगाव बीट स्तरीय सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. दौंड तालुक्याचे लोकनेते मा. रमेश आप्पा थोरात यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी केडगाव बीट स्पर्धा आयोजक व यजमान केंद्रप्रमुख संजय चव्हाण तसेच उपस्थित सर्व केंद्रप्रमुख व पंचांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात जि. प. प्राथमिक शाळा विठ्ठलवाडी (ता. दौंड) येथील बालकलाकारांनी कालबेलिया या गीतावर सादर केलेल्या अप्रतिम नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. या बालकलाकारांचे तसेच मार्गदर्शक शिक्षक युवराज घोगरे व मनीषा दोरगे यांचे मा. रमेशआप्पा थोरात यांनी विशेष कौतुक करून सन्मान केला.
बीट स्तरावरील सहभागी विद्यार्थी व शिक्षकांना शुभेच्छा देताना, जि. प. प्राथमिक शाळा या भावी खेळाडू, कलाकार आणि सुजाण नागरिक घडविणारी संस्कारक्षम केंद्रे असल्याचे मत मा. थोरात यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमास भैरवनाथ माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव सूर्यकांत खैरे, भैरवनाथ माध्यमिक विद्यालयाचे माजी प्राचार्य व खजिनदार अरुण थोरात सर, खुटबाव गाव तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष नानासाहेब थोरात, मुख्याध्यापक विनायक कांबळे, पुणे जिल्हा एकल शिक्षक सेवा मंच अध्यक्ष प्रदीप वाघोले, बापूराव खळदकर, अशोक कदम, रामदास बारवकर यांच्यासह समस्त शिक्षकवृंद उपस्थित होता.
कार्यक्रमाचे स्वागत नवनाथ थोरात सर यांनी केले. स्पर्धेतील विजयी संघ व स्पर्धकांना दौंड येथील प्राथमिक शिक्षण अधिकारी संजय महाजन यांच्या शुभहस्ते प्रशस्तीपत्रे प्रदान करण्यात आली.
